07 March 2021

News Flash

शरीरावरील कोणत्याही दुखापतीविना हृदयाला जखम

दहा दिवसांच्या उपचारानंतर बरा झालेला हा तरुण आता बिहारमधील आपल्या गावी परतला आहे.

शीव रुग्णालयात एक्स-रेच्या मदतीने हृदय शस्त्रक्रिया; २२ वर्षीय तरुणाची मरणाच्या दारातून सुटका

शरीरावर कोणतीही जखम वा दुखापत झालेली नसताना बेशुद्धावस्थेत सापडलेल्या एका २२ वर्षीय तरुणाच्या हृदयाच्या उजव्या कप्प्याचा भाग फाटल्याची घटना दोन आठवडय़ांपूर्वी चेंबूर येथे घडली. या तरुणाला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याच्या बचावण्याची शक्यता धूसर होती. परंतु, रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अतिशय कुशलतेने एक्स-रेच्या मदतीने त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली. दहा दिवसांच्या उपचारानंतर बरा झालेला हा तरुण आता बिहारमधील आपल्या गावी परतला आहे.

सुमारे दोन आठवडय़ांपूर्वी पोलिसांना चेंबूर येथे २२ वर्षांचा ट्रकचालक अजयराज चौधरी बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी त्याला तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले. अजयची अवस्था पाहून त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी बांधला. शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. सूरज तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. विनीत कुमार यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन हृदयशल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉ. वैभव व डॉ. गणेशकुमार यांनी एक्स-रेची तपासणी केली तेव्हा हृदय आतल्या आत फाटून उजव्या झडपेमधून रक्त वाहत असल्याचे दिसून आले. या रक्ताची बनलेली गुठळी फुग्यासारखी झाली होती. तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यासाठी केवळ एक्स-रेवर अवलंबून न राहता सीटी स्कॅन करण्याची आवश्यकता होती. तथापि रुग्णांचा रक्तदाब खूपच खाली आल्यामुळे सीटी स्कॅन करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. अखेर रात्री एक्स-रेचा वापर करून हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदयातील झडपेचा फाटलेला भाग शस्त्रक्रिया करून बंद करण्यात आला. रक्ताची गुठळी काढून टाकण्यात आली. त्यानंतर आठ दिवस अजयराज याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. संपूर्ण बरा झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी तो बिहारमधील आपल्या गावी परत गेला तो शीव रुग्णालयातील डॉक्टरांना धन्यवाद देतच.

हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाणे ९८ टक्के

हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय खांडेकर यांनी  शीव रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण विभागात हृदयविकाराचे सुमारे शंभर रुग्ण दररोज येत असतात असे सांगितले. वर्षांकाठी येथे चारशेहून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या जातात. यामध्ये साधारणपणे १२५ बायपास शस्त्रक्रिया केल्या जातात. तर व्हॉल्व बदलाच्या व फुफ्फुसाच्या तीनशे शस्त्रक्रिया होत असल्याचे डॉ. खांडेकर यांनी सांगितले. तीन महिन्यांच्या बाळापासून ७५ वर्षांच्या वृद्धापर्यंत साऱ्यांच्याच हृदय शस्त्रक्रिया येथे होत असून या शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण हे जवळपास ९८ टक्के एवढे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:13 am

Web Title: heart surgery with the help of x ray
टॅग : Sion Hospital
Next Stories
1 पोलिसाच्याच घरात चोरी
2 एकतर्फी प्रेमातून करिश्माची हत्या?
3 कातकरी समाजाची ‘घर’घर संपणार!
Just Now!
X