News Flash

युवा वक्त्यांच्या भाषणात अनेक मुद्दय़ांना निर्भीड स्पर्श

वक्तृत्व स्पर्धेत सहभागी आठही युवा वक्त्यांनी अनेक मुद्दय़ांना निर्भीड स्पर्श केला

अभिजित खोडके , स्वानंद गांगल

लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी आठही युवा वक्त्यांनी अनेक मुद्दय़ांना निर्भीड स्पर्श केला. त्यांच्या या निर्भिडपणाचे कौतुक प्रमुख पाहुणे नाना पाटेकर यांनीही मुक्तकंठाने केले.

करंजभाट समाजात लग्न झालेल्या दिवशीच नवविवाहितेला आपले क्रौमार्य भंग झालेले नाही, यासाठी पुरावे द्यायला लागणे म्हणजेच स्त्रियांना आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी एकविसाव्या शतकातही झगडावे लागतच आहे, याचे द्योतक आहे. ज्या समाजाने पाच पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीला पूजले, विवाहाआधी कर्णाला जन्म देणाऱ्या कुंतीचाही आदर केला त्यांनी स्त्रियांच्या क्रौमार्यासारख्या क्षुल्लक मुद्याला महत्वाचा विषय बनवत त्यावर वादंग करावा हे योग्य नाही,  अशा ओघवत्या शब्दांत रिध्दीने क्रौमार्य चाचणीवरून उभ्या राहिलेल्या स्त्री-पुरूष वादंगातून बाहेर पडत पुढे जाण्याचा विचार लोकांसमोर मांडला. तर जेव्हा जेव्हा अन्याय्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा विचारपूर्वक भूमिका मांडणे आणि त्यानुसार वागणे गरजेचे असते, असे सांगत त्याअर्थाने प्रतिकात्मक मेरिल स्ट्रीप आपल्या प्रत्येकात असायला हवी ही आजच्या काळाची गरज अभिजीत खोडकेने विशद केली.

हॅशटॅग क्रांतिकाळ हा विषय मांडताना तंत्रज्ञानाच्या मदतीने उभे राहिलेले हॅशटॅगचे शस्त्र एका सुईसारखे आहे. ती टोचण्यासाठी वापरावी की तिच्या मदतीने मानवी मनांचे धागे जोडावे, हे ठरवायला हवे, असे आवाहन पुण्याची वृषाली घाटपांडे हिने केले. ‘शूर्पणखेचं हसणं’ ही अगदी ताजी घटना लक्षात घेताना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या तात्विक, राजकीय, सामाजिक संदर्भाचा, विचारांचा उहापोह औरंगाबादच्या भरत रिडलॉन याने केला. ‘गाय का माय’ हा विषय मांडताना मुळात गाईची तुलना आईशी का केली जाते, या मुलभूत विचारापासून पुढे जात कोल्हापूरच्या अक्षय नलावडेने विज्ञाननिष्ठ धर्माची कास धरत जे जे प्रिय ते ते पूज्य या तत्वाने वागले पाहिजे, असे मत मांडले. ‘आपण फक्त भक्तच’ या विषयातून व्यक्तीपूजेऐवजी मूल्यपूजेवर भर दिला तर आपण पुढे जाऊ शकू, हा विचार नाशिकच्या महेश अहिरेने मांडला. बोलघेवडय़ांची संख्या वाढल्याने बजबजपुरी निर्माण झाली आहे, हा मुद्दा श्रेयसी शिरसाट हिने मांडला.

जातींना कवटाळून समांतर न्यायव्यवस्था!

समाज प्रगतीच्या विचारांची कास धरत असतो हे सत्य असले तरी जी व्यवस्था आठशे वर्षांपूर्वी न्याय देण्यासाठी बनवण्यात आली होती तीच व्यवस्था गोत्र, क्रौमार्य, जातीसारख्या विचारांना कवटाळून बसत समांतर न्यायव्यवस्था चालवते आहे, यातला फोलपणा जाणवून देत खाप ही कुठली व्यवस्था नाही तर ती समाजाची मानसिकता आहे. यात पुरूषी वर्चस्ववाद आहे, हुकूमशाही मानसिकता आहे. व्यक्तीच्या मनातील ही खल मानसिकता ओळखून ती खाप दूर केली पाहिजे, अशी भूमिका स्वानंद गांगल याने ‘आपल्या समाजाची खाप’ या विषयातून मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 3:52 am

Web Title: heart touching speech by young speaker in loksatta oratory competition
Next Stories
1 ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’कडे शिवसेनेची पाठ
2 वेतन दिरंगाईबद्दल अभियांत्रिकी महाविद्यालयांवर कारवाई!
3 भाजपशी युतीच्या चर्चेने शिवसैनिकांत चलबिचल!
Just Now!
X