पूर्व बिहार ते ओरिसाच्या किनारपट्टीदरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे व उत्तरेकडून वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे या भागात उष्णतेची लाट पसरली आहे. मात्र हरयाणा, चंदिगढ व मध्य प्रदेशचा पश्चिम भाग वगळता इतर ठिकाणच्या कमाल तापमानात दोन दिवसांत घट होणार असून विदर्भातील दिवसाच्या तापमानातही दोन अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. दरम्यान पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात गारपिटीसह पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.
मे महिन्यात दरवर्षी उष्णतेची लाट येते. मात्र या वेळी बिहार व ओरिसादरम्यानचा कमी दाबाचा पट्टा व उत्तरेकडून जमिनीवर वाहणारे तप्त वारे यामुळे कमाल तापमानात वाढ झाली. मात्र पावसाळ्यानंतरही एप्रिलपर्यंत सुरूच राहिलेला पाऊस अचानक थांबल्याने देशातील विविध भागांत तापमान वाढले. त्यामुळे ओरिसा, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, हरयाणा या ठिकाणी उष्णतेतही लाट आली. कामगार, शेतकरी, बेघर यांचे प्राण घेणारी उष्णतेची लाट आता ओसरणार आहे. विदर्भातील कमाल तापमानात दोन अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला आहे. उत्तर व मध्य भारतात उष्णतेची लाट आणखी तीन दिवस कायम राहणार असली तरी कमाल तापमानात त्यानंतर घट होण्यास सुरुवात होईल. पश्चिम मध्य प्रदेश, पंजाब व हरयाणामध्ये ३१ मेपर्यंत तापमानात वाढ राहील.
मुंबईतील दमट वातावरणामुळे कमाल तापमानावर नियंत्रण राहत असून कमाल तापमान ३५ अंश सें.दरम्यान कायम आहे. मुंबईतील आकाश ढगाळलेले राहणार असले तरी मान्सूनपूर्व सरींची शक्यता तूर्तास वेधशाळेने फेटाळली आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात गारपीट
गेले वर्षभर सुरू असणारी अवकाळी पावसाची सर मान्सूनपूर्व काळातही मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात कोसळणार आहे. २९ व ३० मे रोजी या भागात गारपिटीसह पाऊस येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये?
मान्सून पुढे सरकण्यास हवामान अनुकूल असून वेधशाळेच्या अंदाजानुसार ३१ मे रोजी केरळमध्ये पावसाचे आगमन होईल. केंद्रीय वेधशाळेने दिलेल्या पाच दिवसांच्या अंदाजात मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. साधारणपणे दरवर्षी १ जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होतो. या वर्षीही मान्सून वेळेवर पोहोचणार असल्याचे संकेत मिळत आहेत.