05 March 2021

News Flash

उजव्या मार्गिकेत अवजड वाहनांची सर्रास घुसखोरी

जड वाहनांबरोबरच लहान वाहनेही मार्गिकेची शिस्त मोडतात.

|| सुशांत मोरे

साठ दिवसांत ७५ हजार प्रकरणांची नोंद; बोरघाटात सर्वाधिक उल्लंघन :- महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उजव्या मार्गिकेतून जाण्यास अवजड वाहनांना बंदी असतानाही चालक सर्रास हा नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ६० दिवसांत अशा ७५ हजार प्रकरणांची नोंद महामार्ग पोलिसांकडून करण्यात आली आहे. यातील १४ हजार प्रकरणे एकटय़ा बोरघाटातील आहेत.

राज्यातील ज्या महामार्गावर येण्या-जाण्याच्या दोन मार्गिका आहेत, तिथे जड-अवजड वाहनांना डाव्या मार्गिकेचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र वाहनचालक उजव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. जड वाहनांबरोबरच लहान वाहनेही मार्गिकेची शिस्त मोडतात. मार्गिकेची शिस्त न पाळण्याचा हा प्रकार बरेचदा अपघातांना आमंत्रण देणारा ठरतो. दुसरीकडे वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड-अवजड वाहनांना डाव्या मार्गिकेचा वापर करण्याचे र्निबध महामार्ग वाहतूक पोलिसांकडून घालण्यात आले आहे.याचे सर्रास उल्लंघन होत असल्याने वाहतूक पोलिसांनी सप्टेंबर महिन्यापासून मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उगारत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये उजव्या मार्गिकेचा नियम न पाळणारी ७५ हजार वाहने आढळून आली. या वाहनचालकांकडून १ कोटी ५१ लाख ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कुठे आणि किती प्रकरणे?

  • पळस्पे            ६,६४१ प्रकरणे
  • मनोर             ५,८९० प्रकरणे
  • चिंचोटी           ४,११३ प्रकरणे
  • शहापूर            ३,६५१ प्रकरणे
  • चारोटी             २,६३२ प्रकरणे
  • खंडाळा             २,४९९ प्रकरणे
  • वडगाव             १,९४८ प्रकरणे
  • जालना            १,३५५ प्रकरणे
  • करंजी             १,५८९ प्रकरणे

बोरघाटात सर्वाधिक उल्लंघन

बोरघाटात या नियमाला सर्वाधिक हरताळ फासण्यात आल्याचे दिसून आले. दोन महिन्यांत या ठिकाणी तब्बल १४ हजार ३२८ प्रकरणे दाखल झाली आहेत. यात २८ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर मनोर, पळस्पे, शहापूर, खंडाळा, जालना येथेही मोठय़ा प्रमाणात जड-अवजड वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

मुळातच महामार्गावरून उजव्या मार्गिकेतून जाण्यास अवजड वाहनांना मनाई आहे. तरीही या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते व अपघात घडतात. अशा वाहनांवर कारवाई केली जात असून दोन महिन्यांत ७५ हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे.

– विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस (मुख्यालय)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 12:20 am

Web Title: heavy infiltration heavy vehicles right way akp 94
Next Stories
1 रेल्वे रुळांवर पेटता सिलिंडर
2 ‘मेट्रो-३’च्या कामांमुळे इमारतीला तडे
3 जे.जे. रुग्णालयात ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा
Just Now!
X