मुंबई : शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरी रेल्वे आणि बेस्ट बस सेवांवर मोठा परिणाम झाला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे बेस्टचे मार्ग वळवण्यात आले. तर दृश्यमानता कमी असल्याने मोटरमनला उपनगरी रेल्वे चालवणे कठीण गेले. त्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेवरील गाडय़ा पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या.

सोमवारी पावसाने हजेरी लावली असतानाच मंगळवारी मात्र पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. यात पश्चिम व मध्य रेल्वेवरील लोकल सेवांवर परिणाम झाला. पावसाचा जोर मध्य रेल्वेवरील सर्वच मार्गावरील उपनगरी रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. तर पश्चिम रेल्वेवर नायगाव स्थानकाजवळ दुपारी पॅसेंजर बंद पडल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरी रेल्वेही विलंबाने धावत होत्या. दुपारपासून पावसाचा जोर वाढला आणि कमी दृश्यमानतेमुळे मोटरमनला रेल्वे चालवणे कठीण होत होते. सीएसएमटी, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा उशिराने धावत असल्याने येथून सुटणाऱ्या गाडय़ांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला होता. मुंबईतील सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे बेस्ट बस गाडय़ाही अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. हिंदमाता, गांधी मार्केट, सायन, अंधेरीतील मिलन सबवे, कुर्ला, चेंबूर, अँटॉप हिल आदी मार्गावरील बसफेऱ्या वळविण्यात आल्या होत्या.