नागरिकांचे प्रचंड हाल

मुंबई, ठाणे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात शुक्रवारी दुपारनंतर सुरू झालेल्या जोरदार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते वाहतुकीची दैना झाली.

भुयारी मार्गामध्ये साचलेल्या पाण्यामुळे दीड ते दोन तास एकाच जागी वाहने खोळंबल्याचे चित्र विविध भागांत दिसत होते.  मुलुंड-नवी मुंबई मार्ग, ठाणे- बेलापूर- महापे मार्गावर शुक्रवारी सायंकाळी अभूतपूर्व कोंडी झाल्यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले. तर अनेकांना २००५ सालातील २६ जुलैच्या भीषण प्रलयाची आठवण झाली.

त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने कर्जतहून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.  त्यामुळे मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांवर संध्याकाळच्या वेळेत नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. रूळांवर पाणी साचल्याने कल्याण ते बदलापूर दरम्यानची लोकलसेवा रात्री साडेदहानंतर बंद करण्यात आली. विमानसेवेवरही पावसाचा परिणाम झाल्यामुळे १७ विमाने अन्य विमानतळांवर वळवण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणातर्फे देण्यात आली.

हिंदमाता, दादर, अंधेरी, मुलुंड, ठाणे, बोरिवली येथील अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी तुंबले. शीव रोड, गांधी मार्केट, मोतीलाल नगर, वीरा देसाई रोड, एस. व्ही. रोड, नॅशनल कॉलेज या ठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्टच्या वाहतूकीत बदल करण्यात आले. तरीही उपनगरांतील वाहतूक कोंडी उशिरापर्यंत सुटलेली नव्हती.

कल्याण ते बदलापूर मार्गावर सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे या मार्गावर काही काळी वाहतूक कोंडी झाली होती. लांबच्या लांब रांगा लागल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला. ठाण्यात घोडबंदर भागात रात्री उशिरापर्यंत वाहने रखडली होती.

भिवंडीत एकजण बंधाऱ्यात बुडाला

ठाणे : भिवंडी येथील चिंबीपाडा भागातील बंधाऱ्यात एक जण बुडाला.  कैलास भगत असे त्यांचे नाव असून भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन पथकाकडून रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. मुसळधार पावसामुळे शोध कार्यात अडथळे येत होते.

ठाण्यात पडझडीच्या घटना..

ठाणे शहरात शुक्रवारी दिवसभरात ४४.९५ मिमी पावसाची नोंद झाली. वागळे इस्टेट येथील कैलास नगर भागात राहणाऱ्या हिरावती इंद्रजीत पाल यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी वृक्ष उन्मळून पडले. यात त्यांच्या घराची भिंत आणि छताचे नुकसान झाले.

नौपाडय़ातील राम मारूती परिसरात विजेचा खांब कोसळला. दुपारच्या वेळेत या मार्गावर रहदारी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.  ठाण्यातील वंदना एसटी स्थानक, जेल तलाव परिसर, श्रीनगर वागळे इस्टेट परिसर, रेतीबंदर, मुंब्रा, खारेगाव, दिवा तसेच डोंबिवली आणि भिवंडी या शहरातील उंच सखल भागात पाणी साचले होते.

दोन दिवस मुसळधार..

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ात मुसळधार (६५ ते ११५ मिमी)पावसाची शक्यता आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ात अतिमुसळधार (११५ ते २०० मिमी) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला

केसरबाई इमारत पडून झालेली दुर्घटना ताजी असताना गिरगावात म्हाडाच्या एका इमारतीचा भाग कोसळला. सीपी टँक भागातील खख्खर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंतीचा भाग रात्री पावणे नऊच्या सुमारास पडल्यामुळे एकच घबराट पसरली. ही इमारत सात मजल्यांची आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

नवी मुंबईला मोठा तडाखा..

ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली, घणसोली आणि कोपरखैरणे येथील भुयारी मार्गात साचलेले पाणी काढण्यास असलेले पंप कमी पडल्याने येथील वाहतूक संध्याकाळी साडेसहा ते नऊ पर्यंत पूर्ण बंद होती. ऐरोली येथे भुयारी मार्गाच्या कामाने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याने सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर पाणी साठले. त्यामुळे महापेतून मुलुंडकडे जाणारी वाहतूक खोळंबली.