सखल भागांतील घरांत पाणी; कुटुंबे रस्त्यांवर; ओल्या कपडय़ांसह नोकरदारांचे स्थानकात जागरण

मुंबई : सोसाटय़ाच्या वाऱ्यासह बुधवारी दुपारी थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर रात्री काहीसा कमी झाला खरा, पण दिवसभरातील रुद्रावतारामुळे पाण्यावर तरंगू लागलेली मुंबई पुन्हा जमिनीवर येण्यास गुरुवारची सकाळ उजाडली. परिणामी सखल भागांतील बैठय़ा चाळी, इमारतींच्या तळमजल्यांवर राहणाऱ्या कुटुंबांना अवघी रात्र रस्त्यावर किंवा पालिकेच्या निवारा केंद्रांत काढावी लागली. अत्यावश्यक सेवेसाठी बुधवारी सकाळी कामावर आलेल्या नोकरदारांचे हाल तर त्याहून वाईट होते. घरी परतण्यासाठी कार्यालयातून निघालेल्यांना ओल्या कपडय़ांनिशी उपाशीपोटी रेल्वे स्थानकांत तिष्ठत राहावे लागले.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. समुद्राला आलेले उधाण, सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झालेली झाडांची पडझड आणि निचरा न होता साचून राहिलेले पाणी यांमुळे देशाची आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला. मात्र, रस्त्यांवर, घरांत, चाळींत, वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी ओसरण्यास गुरुवारची सकाळ उजाडली. नानाचौकातील भाजीगल्लीतील घरांत बुधवारी पहाटेच पाणी शिरले होते. त्यातच बुधवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर पाण्याची पातळी आणखी वाढली. येथील रहिवाशांनी जवळच्या इमारतींमध्ये आसरा घेतला. मात्र, गुरुवारी सकाळी ते जेव्हा घरी परतले तेव्हा घरभर साचलेला चिखल आणि त्यात अस्ताव्यस्त पडलेले सामान त्यांना पाहायला मिळाले.  हिंदमाताजवळच्या टाटा कंपाउंडमधील घरे तसेच बीआयटी चाळींच्या तळमजल्यांवर चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. चाळींतील रहिवाशांनी माळ्यावरच बसून रात्र काढली. मशीदबंदरमील झोपडपट्टीतील रहिवाशांना तर शेजारच्या इमारतींच्या जिन्यावर बसून पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली.

करोनाच्या टाळेबंदीमुळे मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच ये-जा सुरू असते. या कर्मचाऱ्यांचे बुधवारच्या पावसाने खूप हाल झाले. रस्ते आणि रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्याने या कर्मचाऱ्यांच्या घराकडे जाणारे मार्गच बंद झाले. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर घराकडे निघालेल्या या कर्मचाऱ्यांना ओल्या कपडय़ानिशी रेल्वे स्थानकांत रात्र काढावी लागली. रात्री जोरदार पावसामुळे मुंबईहून दुपारी चार वाजता निघालेल्या शुभदा जोशी रात्री बारा वाजता ठाण्याला आपल्या घरी पोहोचल्या. पावसामुळे एक ते दोन तासांनी बस उपलब्ध होत्या. हिंदमाता दादर, या परिसरात पाणी साठल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.  जोरदार पावसामुळे बसमध्ये पाणी शिरले होते. जवळ खाद्यपदार्थ अथवा पाण्याची बाटलीही नसल्याने काही प्रवाशांना गरगरल्यासारखे झाले, असा अनुभव त्यांनी सांगितला.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कोंडी

सध्या आभासी न्यायालयांद्वारे कामकाज सुरू आहे. अंतर नियमाचे पालन करता यावे यासाठी फारच कमी कर्मचारी दिवसाआड काम करत आहेत. पावसामुळे काही कर्मचारी मंगळवारी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज बुधवापर्यंत तहकूब केले गेले. बुधवारी सकाळी लोकल सुरू असल्याने उपनगरात राहणारे कर्मचारी न्यायालयात पोहोचले आणि ठरल्यानुसार न्यायालयाचे कामकाजही सुरू झाले. मात्र पावसाचा प्रकोप वाढू लागल्याने दुपारी तीननंतर कर्मचाऱ्यांनी घराची वाट धरली. अनेक कर्मचाऱ्यांनी चर्चगेट, सीएसएमटी स्थानक गाठले. पश्चिम रेल्वेवरील लोकल विलंबाने का होईना पण सुरू होत्या. सीएसएमटी स्थानकात मात्र वेगळे चित्र होते. सीएसएमटी स्थानकात पोहोचल्यावर आपण चारची कल्याणला जाणारी लोकल पकडली. लोकल सुटलीही. पण ती स्थानकाच्या बाहेर जाऊन थांबली. आता सुटेल, थोडय़ा वेळा वेळाने सुटेल असे करत साडेतीन तास आम्ही लोकलमध्ये बसून होतो. त्यानंतर ही लोकल पुन्हा स्थानकात आणण्यात आली. आधीच्या दोन लोकल अडकल्याने हा गोंधळ झाल्याचे नंतर आम्हाला कळले. त्यानंतरही आम्ही लोकल सेवा सुरू होईल म्हणून स्थानकातच ठाण मांडून बसलो होतो. मात्र साडेआठच्या सुमारास लोकल आता सुरू होणार नाही हे लक्षात आल्यावर आम्ही पावसात भिजत पुन्हा न्यायालयाचा रस्ता धरला, असे या न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कार्यालयात पोहोचल्यावर अंगावरचे ओले कपडे पिळून पुन्हा परिधान केले. न्यायालय प्रशासनाने न्यायालयाच्या आवारातील उपाहारगृहात व्यवस्था केली होती.

प्रवाशांना आरपीएफची मदत

लोकमान्य टिळक टर्मिनसवरून बुधवारी रात्री सुटणाऱ्या तीन गाडय़ा पावसामुळे रद्द कराव्या लागल्या. त्याबाबत वेळीच सूचना न मिळाल्याने टर्मिनसवर दाखल झालेले सुमारे दीड हजार प्रवासी अडकू न पडले. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय आरपीएफने के ली. सकाळी प्रवाशांसाठी चहा-नाश्त्याचीदेखील सोय करण्यात आली.

वीजपुरवठाही बंद

सुरक्षेच्या कारणास्तव शहर भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. गुरुवारी दुपापर्यंत दक्षिण मुंबईतील अनेक भागात वीज नव्हती. दिवसभरात शॉर्टसर्कीटच्या ५७ तक्रारी पालिकेकडे आल्या.

मुंबईत एका सहकारी बँके त काम करतो. इतर वेळेस त्यांच्या खासगी गाडीने मुंबईहून बेलापूरला जाण्यास साधारण दोन तास तरी लागतात. मात्र, काल जोरदार पाऊस आणि ठिकठिकाणी पाणी साचल्याने घर गाठण्यास तब्बल आठ तास लागले. काही ठिकाणी तर पाणी गाडीत शिरले. तरीही प्रवास थांबवला नाही.

– संजय कठाळे, सीबीडी बेलापूर

महालक्ष्मी परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने काम बंद करण्यात आले. दुपारी ३ च्या सुमारास खारघरला जाण्यासाठी निघालो. परंतु शीव पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने दुचाकीने फ्रीवेचा मार्ग स्वीकारावा लागला.  परंतु तिथेही तीच अवस्था होती. पुढेही रस्त्यावर झाडे पडल्याने एरव्ही दुचाकीवरून पोहोचायला सव्वा तास लागतो, परंतु काल तब्बल साडेतीन तास लागले.

– आकाश पाटील, कोस्टल रोड अभियंता

दुपारी ३.३० नंतर निघालो. मात्र, रेल्वेसेवा बंद असल्याने आणि सर्वत्र पाणी भरल्याने घरी जाता आले नाही. रात्र कार्यालयातच घालवली. शेजारी असलेल्या जीटी रुग्णालयाच्या खानावळीत (कॅ ण्टीन ) सर्वजण जेवलो. सकाळी ६ वाजता रेल्वेस्थानक गाठले. मात्र, पुन्हा निराशा झाली. खासगी गाडीने सर्वजण ठाण्यापर्यंत पोहोचलो. तिथून पुढे रेल्वेसेवा सुरू असल्याने बदलापूपर्यंत पोहोचता आले.

– संदीप खांडेकर, कर्मचारी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय