मुंबई : कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. रविवार, सोमवारी कडक ऊन पडल्यानंतर मंगळवारी मुंबईत हलक्या सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सकाळपासूनच मुंबईतील विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला.

पाऊस दाखल झाल्यापासून मुंबई शहरापेक्षा मुंबई उपनगरात पावसाचे प्रमाण जास्त दिसून येत होते; परंतु बुधवारी वेगळे चित्र दिसले. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत शहर भागात ९८.६ मिलीमीटर पाऊस झाला तर उपनगरात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी येथे ९५ मिमी, रायगड येथे ३६.८ मिमी पाऊस पडला. कोकणातील आकाशात ढगांची दाटी झाल्याने पुढील २ ते ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पालघर येथे २० जूनपर्यंत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड  येथे १९ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे.

पाऊसभान… 

३ जून रोजी मोसमी वारे के रळात दाखल झाले. त्यानंतर मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातून द्रुतगती प्रवास करत दोनच दिवसांत महाराष्ट्रात मजल मारली. मात्र, पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकू ल वातावरणीय स्थिती नसल्याने मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती के लेली नाही. सध्या सूरत, नंदूरबार, भोपाळ, बरेली, अमृतसरपर्यंतची मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीची सीमा कायम आहे.

विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात मोसमी वारे पोहोचले असूनही शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावणाऱ्या मोसमी पावसाने पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात अनेक ठिकाणी समाधानकारक हजेरी लावलेली नाही. पुढील पाच दिवस कोकणात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे.