News Flash

कडेलोट…

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बिरमणी आणि पोसरे या गावांतही दरडी कोसळून चौघांचा मृत्यू झाला, तर १८ ग्रामस्थ बेपत्ता आहेत.

कडेलोट…
  • दरड दुर्घटनांमध्ये ६६ जणांचा मृत्यू
  • रायगडमध्ये ४९ ग्रामस्थ दगावले
  • कोल्हापूर, सांगलीत पूरपरिस्थिती

मुंबई/ अलिबाग/ पुणे/ रत्नागिरी : निसर्गाच्या रौद्र रूपाने राज्यात गेल्या काही दिवसांत माणसाच्या दु:ख सोसण्याच्या सहनशक्तीची, संकटाशी झुंजण्याच्या त्याच्या धैर्याची आणि अखेर जगण्यासाठी पुन्हा उभे राहण्याच्या त्याच्या धडपडीची परीक्षा घेतली. राज्यात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. त्याने दरडींचा कडेलोट केला आणि त्यात सुमारे ६६ नागरिकांचा बळी गेला.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळये गावावर शोककळा पसरली आहे. तेथे गुरुवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत ३८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर किमान ४० ग्रामस्थ मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.  दुसरी दरड दुर्घटनाही रायगड जिल्ह्यातील  पोलादपूर तालुक्यात घडली. केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी येथे दरडी कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात केवनाळे येथील सहा, तर सुतारवाडी येथील पाच जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बिरमणी आणि पोसरे या गावांतही दरडी कोसळून चौघांचा मृत्यू झाला, तर १८ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. ते दरडींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.

पश्चिम घाट क्षेत्रात गेल्या ३६ तासांपासून कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने सातारा जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या आणि डोंगर भूस्खलनाच्या १२ दुर्घटना घडल्या. दरडींखाली घरे गाडली गेल्याने आठ जणांचा मृत्यू झाला असून १५हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

शोकाकुल रायगड

रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळये गावावर गुरुवारी दुपारी ४ वाजता अक्षरश: डोंगर कोसळला. दोन दिवस महाड परिसरात अतिवृष्टी सुरू होती. अतिवृष्टीमुळे गुरुवारी वरंध घाट परिसरातील तळये गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली आणि ३५ पैकी ३२ घरे गाडली गेली. पूरपरिस्थिती आणि संपर्क यंत्रणा कोलमडल्याने दुर्घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. मदतकार्य शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर सुरू करण्यात आले. सकाळी १०च्या सुमारास ‘एनडीआरएफ’ची पथके दाखल झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आणखी ३४ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे मदत आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.

रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडीतही गुरुवारी रात्री १०च्या सुमारास दरडी कोसळल्या. त्यांत केवनाळे येथील सहा, तर सुतारवाडी येथील पाच जण दगावले. सुतारवाडीतील दहा घरे भुईसपाट झाली आहेत. केळवली येथे रात्री साडेआठच्या सुमारास दरड कोसळली. जखमी झालेल्या १३ जणांना पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २४ तासांत पोलादपूर परिसरात ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे नद्या-नाले पात्र सोडून वाहात होते. कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल आणि साखर बोरज येथील पूल वाहून गेला आहे.

मातीचा ढिगारा एक किलोमीटरपर्यंत

तळये गावातील कोंडाळकर वाडीवर कोसळलेल्या दरडीचा ढिगारा एक किलोमीटरपर्यंत पसरला आहे. तो उपसून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

साताऱ्यात आठ दगावले

सातारा जिल्ह्यालगतच्या पश्चिम घाट क्षेत्रात तीन दिवसांपासून तुफान पाऊस कोसळत असून गुरुवारपासून पाटण, जावली, वाई, महाबळेश्वर तालुक्यात १२ दुर्घटना घडल्या. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. वाई तालुक्यातील देवरुखवाडी, जावळी तालुक्यातील रेंगडीवाडी, पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी, कोयनानगर, किल्ले मोरगिरी, टाळेवाडी, गुंजाळी, काठेवाडी, मेष्टेवाडी, टोळेवाडी, जितकरवाडी, कामगारगाव आदी ठिकाणी डोंगराचा भाग खचून त्याखाली काही घरे गाडली गेली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती

पुणे : कोकणाबरोबरच पश्चिम-मध्य महाराष्ट्रालाही अतिवृष्टीने तडाखा दिला. महाबळेश्वरमध्ये २४ तासांत देशातील सर्वाधिक ५९०, तर पुणे जिल्ह्यातील ताम्हिणीत ४७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांत अनेक नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. काही नद्यांनी पात्र सोडले आहे. कोल्हापूर, सांगलीत महापुराची स्थिती आहे. विदर्भातील गोंदिया, अकोला आणि मराठवाड्यातील परभणी, नांदेडलाही पावसाने झोडपून काढले.

१५ जिल्ह्यांना तडाखा…

’दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे ७० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, ४०-५० हून अधिक जखमी.

’कोकणात दरडी कोसळल्याने ५५ नागरिकांचा बळी. चार हजार नागरिक सुरक्षितस्थळी.

’कोकणातील सर्व जिल्ह्यांना सर्वाधिक फटका, ५५८ गावांतील नऊ हजार नागरिक बाधित.

’अतिवृष्टीमुळे कोकणातील  १४४१ हेक्टर शेतीचे नुकसान.

’मुंबई, कोकणातील पावसाचा जोर कमी, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात मुसळधार.

’पूरग्रस्त भागात लष्करासह राष्ट्रीय आपत्ती निवारण, राज्य आपत्ती निवारण पथकांचे बचावकार्य.

’कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अहमदनगर, अमरावती, भंडाऱ्यालाही तडाखा.  राज्यात पावसामुळे १ जूनपासून आतापर्यंत १२९ नागरिकांचा बळी.

राज्यातर्फेपाच, तर केंद्राकडूनदोन लाख: दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख

रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. जखमींवरील उपचारखर्चही सरकारतर्फे करण्याचे त्यांनी जाहीर केले. रायगडमधील तळये दरड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2021 1:52 am

Web Title: heavy rain fall heavy rain 38 civilians killed accident search for missing citizens akp 94
Next Stories
1 रुग्णालयात पाणी शिरल्याने १० करोना रुग्णांचा मृत्यू
2 ‘एसटी’च्या टपावर नऊ तास..!
3 रायगडमध्ये आपत्ती व्यवस्थापनात त्रुटी
Just Now!
X