मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातल्या सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या चार दिवसाच्या काळात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून काम करण्याचे आणि समन्वय राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी, या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना कळवण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- पाऊस आला रे! मान्सून महाराष्ट्रात दाखल

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी,  या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन  प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी.  जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

आणखी वाचा- समजून घ्या : मान्सून नेमका ओळखायचा कसा? मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसामधील फरक काय?

दोन दिवसांपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. ते भाकीत खरं ठरताना दिसत आहे. मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत महाराष्ट्रात मानसून दाखल झाल्याची माहिती दिली होती.