मुंबई : मुंबईत शनिवारी तुलनेने कमी पाऊस होऊनही अनेक भागांत पाणी तुंबले आणि मुंबईचा वेग मंदावला. रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तर दादर, शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पहाटेपासून सुरू असलेली मुसळधार आणि दुपारी समुद्रास आलेली भरती यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले.

दरम्यान मुंबई, ठाण्यासह उपनगरांना दिलेला दक्षतेचा इशारा कायम असून रविवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार बुधवारच्या तुलनेत शहरात शनिवारी कमी पावसाची  नोंद झाली. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत कु लाबा केंद्राने सरासरी ९० मिलीमीटर, तर सांताकू्रझ केंद्राने सरासरी १०७ मिलीमीटर पावसाची नोंद केली. शनिवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३०पर्यंत सांताक्रूझ येथे ६४.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहर आणि पूर्व उपनगरांच्या तुलनेत पश्चिम उपनगरात पाऊस अधिक होता.

 लोकल विस्कळीत

मुसळधार पावसामुळे कु र्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान आणि चुनाभट्टी स्थानकात साचलेल्या पाण्यामुळे शनिवारी मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी हार्बर लोकल सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील लोकल दुपारी १२ पर्यंत सुरळीत होत्या. परंतु भरतीही आणि मिठी नदीतील पर्जन्यवाहिन्यांचे दरवाजे बंद के ल्याने रुळांवर पाणी साचले. रुळांवरील पाणी वाढताच दादर ते कु र्ला दरम्यान दुपारी सव्वा बारापासून लोकल सेवा बंद ठेवण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा मात्र सुरळीत सुरू होती.

 

रस्ते वाहतूक मंदावली

सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने रहदारीचा वेग मंदावला. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादर, शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दोन फु टांहून जास्त पाणी साचले होते. त्यामुळे पाणी ओसरेपर्यंत हा मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली. पश्चिाम उपनगरांतील सर्व भुयारी मार्गांमध्ये (सब-वे) पाणी साचल्याने वाहतूक मंदावली.

 

विजांच्या कडकडाटासह पाऊस

सर्वसाधारणपणे पूर्वमोसमी पाऊस आणि परतीचा पाऊस विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पडतो. यावर्षी मोसमी पाऊस मुंबईत दाखल होऊन चार दिवस लोटले तरीही विजांचा कडकडाट कमी झालेला नाही; कारण पावसाने पूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरीही अद्याप पूर्ण देश व्यापलेला नाही. एखाद्या वेळी पावसात मोठा खंड पडला तर वाढलेल्या आद्रतेमुळेही ढगांचा गडगडाट होतो. ‘मेसोस्के ल’ म्हणजेच ठरावीक एखाद्या ठिकाणीच पाऊस पडत असतानाही अशी स्थिती असते.

मोसमी पावसाच्या आगमनाची प्रक्रिया अद्याप सुरू असून संपूर्ण देश व्यापेपर्यंत विजांचा कडकडाट सुरू राहील. – कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग 

 

पवई तलाव भरला

पूर्वमोसमी पाऊस आणि मोसमी पावसाचे अतिमुसळधार सरींसह आगमन यामुळे एका आठवड्यातच पवई तलाव भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ दिवसआधीच पवई तलाव भरला आहे. गेल्या वर्षी ५ जुलैला पवई तलाव वाहू लागला होता.

 

…अखेर रडार सुरू

गेल्या महिन्यात ऐन वादळाच्या वेळी बंद पडलेले भारतीय हवामान विभागाचे कु लाबा येथील डॉप्लर रडार शनिवारी सुरू झाले. हे रडार नादुरुस्त झाल्याने उपग्रहाद्वारे मिळालेल्या नोंदींच्या आधारेच पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. ‘उपग्रह अवकाशातून ढगांचे निरीक्षण करतो तर, रडार जमिनीवरून ढगांचा खालचा स्तर पाहते. दोन्ही एकमेकांना पूरक  असतात’, अशी माहिती हवामान विभातील माजी अधिकारी डॉ. रंजन के ळकर यांनी दिली.