मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

दोन दिवस रात्रपाळी केलेल्या पावसाने शनिवारी दुपारी मुंबई परिसरात जोरदार हजेरी लावली. हा पाऊस तासाभरात ओसरला असला तरी सोमवारपासून पुढील तीन दिवस मुंबईसह कोकण परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

शनिवारी सकाळपासून आकाशात हळूहळू जमू लागलेल्या ढगांनी भर दुपारी संध्याकाळची वातावरणनिर्मिती केली. मात्र हा पाऊस तासाभरात ओसरला आणि मग लख्ख ऊन पडले. हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रांवर मात्र रात्री साडेआठपर्यंतच्या बारा तासांमध्ये सांताक्रूझ येथे अवघ्या १४ मिमी तर कुलाबा येथे १६ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कमाल तापमान नियंत्रणात राहिले. सांताक्रूझ येथे ३० अंश से. तर कुलाबा येथे कमाल २९ अंश से. तापमान होते. राज्यभरात अनेक ठिकाणी याचीच कमीजास्त प्रमाणात पुनरावृत्ती झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि मध्यप्रदेश येथे मोसमी वारे सक्रिय झाले असून या सर्व राज्यांमध्ये येत्या काही दिवसात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांमधील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने जिल्हा पातळीवरही सावधगिरीचे उपाय योजण्यात आले आहेत. सध्याच्या अनुमानानुसार गुरुवापर्यंत ही स्थिती राहील.

रविवारी राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता असून सोमवारी कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढणार आहे. त्यातही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांमधील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.