पावसाचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास सुरू झाला असताना राज्यातील पर्जन्यमानाचे चित्र सुखावह दिसत आहे. कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडय़ातही यावेळी पावसाने सरासरीपेक्षा अधिक कामगिरी केली आहे.
यावेळी जून महिन्यातच जोरदार प्रवेश केलेल्या पावसाने राज्यभर दमदार कामगिरी केली आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्य़ांमध्ये पावसाचे प्रमाण दरवर्षीप्रमाणे चांगले राहिले आहे. तर दुष्काळी प्रदेश असलेल्या विदर्भात यावेळी ओल्या दुष्काळाची परिस्थिती ओढवल्याचे दिसत आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली येथे २४ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या तुलनेत दीडशे टक्के पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिकमध्येही पावसाचे प्रमाण २६ ते ६२ टक्के अधिक राहिले आहे.
दुष्काळग्रस्त भागाचा शिक्का बसलेल्या मराठवाडय़ात राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कमी पाऊस पडला असला तरी सरासरीपेक्षा सर्वच जिल्ह्य़ाची परिस्थिती चांगली आहे. लातूर येथे एक टक्का तर कोल्हापूर येथे तीन टक्के पाऊस अधिक झाला. उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्य़ात एकशेदहा टक्क्य़ांहून अधिक पाऊस झाला आहे.  
चंदीगढ, बिहार आणि झारखंडचा अपवाद वगळता देशातही पावसाने सरासरीपेक्षा अधिक कामगिरी केली आहे. मध्य भारत तसेच काश्मीरमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्य़ांहून अधिक पाऊस झाला आहे.