दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडत असतानाच मुंबईपासून जवळच असलेल्या रायगडमध्येही पाऊस सुरू झाला आहे. येत्या ४८ तासांत दक्षिण कोकणात मोसमी पाऊस जाहीर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मुंबईत मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
केरळमध्ये प्रवेश केल्यावर साधारण सात दिवसात पाऊस राज्यात येतो. मात्र यावेळी पाऊस अधिक वेगाने राज्यात प्रवेश करेल. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतही लवकरच पावसाचा प्रवेश होईल, असे सांगण्यात आले.
केरळमध्ये आठवडाभराच्या विलंबाने दाखल झालेल्या मोसमी पावसाने पुढील प्रवास मात्र वेगाने केला आहे. अवघ्या एका दिवसात मुसंडी मारत दुष्काळग्रस्त असलेल्या कर्नाटकच्या अंतर्गत भागात बुधवारी पावसाने प्रवेश केला. कर्नाटक किनारपट्टीसह दक्षिण भाग, रायलसीमा तसेच आंध्र प्रदेशची किनारपट्टी त्याने व्यापली.
राज्यातही पाऊस प्रवेश करता झाला असून दक्षिण कोकणात गेले तीन दिवस पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्हय़ातील खेड तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल संगमेश्वर (५१ मिमी) आणि लांजा तालुक्यातही (३३ मिमी) या पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्हय़ात एकूण सरासरी २२.८ मिलिमीटर पावसाची नोंद या कालावधीत झाली आहे. रायगडमधील श्रीवर्धन येथे ६३ मिमी पावसाची नोंद झाली. रोहा, मुरूड, महाडसह रायगडमधील बहुतांश ठिकाणी पावसाच्या मध्यम सरींची नोंद झाली. कोल्हापूरमध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या तर सांगली, सातारा येथे तुरळक सरी आल्या.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा कोकणासह दक्षिण किनारपट्टीच्या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याने शेतकरी सुखावला असून सध्या पडू लागलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.

पावसाचे आगमन..
वर्ष – केरळ – महाराष्ट्र
२०११- २९ मे – ३ जून
२०१२ – ५ जून – ६जून
२०१४- ६ जून – ११ जून
२०१५ – ५ जून – ८ जून

रत्नागिरी जिल्हय़ात अतिवृष्टीचा इशारा
आगामी ४८ तासांत रत्नागिरी जिल्हय़ात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत जिल्हय़ात सुमारे १२ ते २४ सेंटिमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून रविवारपासूनच्या (१२ जून) पुढील ४८ तासांत सुमारे ६.५ ते १२.५ सेंटिमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदाच्या मोसमात हवामान विभागाने दिलेला हा पहिलाच सावधगिरीचा इशारा आहे.