मुंबईसह राज्यात काल (गुरूवार) रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेवरही झाला असून पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेवरही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा धीम्या गतीने सुरू आहे. आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात दोन तासांत ६१.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुब्र्याजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील रेल्वेगाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.  ठाण्यातील वंदना टॉकीज, सिव्हिल हॉस्पिटल येथे पाणी साचलं असून सखल भागात घरातमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. कल्याण परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून विविध भागात नाल्याचे पाणी शहरात शिरले आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातही पावसाची संततधार सुरू आहे. विदर्भातील चंद्रपूरमध्ये प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत, सरासरी ४१.३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापुरातील शिंगणापूर नाक्याजवळ पंचगंगेच्या प्रवाहात जीपगाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे. सांगलीमध्येही पावसाचा जोर कायम आहे.
गुजरातच्या वलसाडमध्येही जोरदार पाऊस सुरू असून रेल्वेस्टेशनवरील ट्रॅकवर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई-अहमदाबाद-दिल्ली रेल्वेसेवेवरही परिणाम झाल्याचं दिसत आहे.