मोडकसागर काठोकाठ; घाटकोपरमध्ये सर्वाधिक पाऊस; ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार

मराठवाडय़ासह विदर्भावर रुसलेल्या पावसाने मुंबईत जोरदार ‘पेरणी’ केली आहे. शहरात अजूनही पावसाने सरासरी भरून काढली नसली तरी शहराबाहेरील तलावक्षेत्रात मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळेच या वेळी काठोकाठ भरून वाहण्याचा पहिला मान तुळशी तलावाऐवजी मोडकसागरने पटकावला आहे. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता मोडकसागर भरून वाहू लागला. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत या तलावात केवळ ७३ टक्के पाणीसाठा होता.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी दोन तलाव तुळशी व विहार हे मुंबईत येतात. तर तानसा, भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा हे पाच तलाव ठाणे परिसरात आहेत. तुळशी तलावात सर्व तलावांच्या एकूण क्षमतेच्या जेमतेम अर्धा टक्का पाणी मावते. त्यामुळे दरवर्षी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लहानसा तुळशी तलाव सर्वात आधी भरून वाहतो.  या वेळी मात्र पहिल्यांदा ओसंडून वाहण्याचा मान मोडकसागरने पटकावत तुळशी तलावाची परंपरा खंडित केली आहे.  महिन्याभराच्या पावसानंतर तलावक्षेत्रामधील पाणीसाठा तब्बल ९ लाख दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. तलावांची एकूण क्षमता १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर असून आजमितीला तलावात ६२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

घाटकोपरमध्ये १४६ मिमी पाऊस

हवामानशास्त्र विभाग व पालिका यांनी संयुक्तरित्या उपनगरात लावलेल्या पर्जन्यमापन केंद्रामधून आलेल्या माहितीनुसार घाटकोपर येथे शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात तब्बल १४६ मिमी पाऊस पडला. पूर्व उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मुलुंड आणि भांडुप येथे प्रत्येकी६३ मिमी, पवई येथे ९५ मिमी तर चेंबूर येथे ८२ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरात ददार येथे ४२ मिमी, वांद्रे येथे ३३ मिमी, अंधेरी येथे ६३ मिमी, मालाडे येथे ५७ मिमी तर बोरीवली येथे ५६ मिमी पाऊस झाला. वरळी येथे ६० मिमी तर माझगाव येथे ४३ मिमी पावसाची नोंद झाली.

कल्याण-डोंबिवलीत सखल भाग जलमय

कल्याण : कल्याण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. टिटवाळा, कल्याण ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री टिटवाळा ते वृंदा परिसरातील बारा गावांना जोडणारा काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. या पुलावर दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे टिटवाळ्याकडून होणारी वाहतूक ठप्प झाली होती. या गावांकडे जाणारी बस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहन चालकांना टिटवाळा, आंबिवली परिसरातून आपल्या गावी जावे लागत होते. रात्री पुराचे पाणी ओसरले. वृंदा, फळेगाव, आंबिवली, खडवली, वासिंदकडे जाण्यासाठी टिटवाळा भागातील रहिवासी काळू नदीवरील पुलाचा वापर करतात. परंतु, मुसळधार पावसामुळे कोणत्याही क्षणी पुलावर पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने अनेक रहिवासी टिटवाळा, आंबिवली रस्त्याचा वापर करीत आहेत. कल्याण तालुक्यातील दहागाव, पोई, गोवेली, उशीद परिसरात भात शेतीची कामे जोमाने सुरू आहेत. परंतु, शेत पाण्याने भरून गेल्याने शेतात ट्रॅ्क्टर, नांगर फिरवणे अवघड झाले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून काम बंद ठेवण्यात आले आहे. डोंबिवली परिसरातील खाडी किनारच्या बेकायदा चाळींमध्ये पाणी घुसले आहे.