29 September 2020

News Flash

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस; मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग

संग्रहित छायाचित्र

मुंबईसह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. पहाटेपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई शहर आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. अंधेरी, पवई, मुलुंड, भांडूप, कांजूरमार्गमध्ये रात्री जोरदार पाऊस झाला. डोंबिवली, कल्याण शीळफाटा परिसरातही मुसळधार पाऊस झाला आहे. नवी मुंबईतील ऐरोलीतही पावसाचा जोर कायम आहे.

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. अंबरनाथ-बदलापूरमध्ये पहाटेपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे बदलापूरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातही पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरु आहे.

मुंबईसोबतच राज्याच्या अनेक भागांमध्येही दमदार पाऊस सुरु आहे. उजनी धरणातून ७० हजार क्युसेक आणि वीर धरणातून १५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पंढरपूरच्या सखल भागांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील धरणेदेखील पूर्ण भरली आहेत. सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. मागील पाच दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे लहान-मोठ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2017 9:22 am

Web Title: heavy rain in mumbai and many parts of maharashtra
Next Stories
1 सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न अधांतरीच
2 उपनगरवासीयांचा प्रवास सुकर
3 वर्षभर आवाज चढाच..
Just Now!
X