मुंबई आणि उपनगर परिसरात गुरूवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उपनगरात अवघ्या तासाभरात अनेक ठिकाणी पाणी साचले. पावसाला सुरूवात होण्यापूर्वी आकाशात मोठ्या प्रमाणावर वीजांचा कडकडाट सुरू होता. त्यानंतर अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुंबईच्या तुलनेत उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. त्यामध्ये जोरदार वाऱ्याची भर पडल्याने संध्याकाळी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सायन, चेंबूर, टिळकनगर, मानखूर्द, घाटकोपर, विक्रोळी या ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. तर सायन आणि दादर परिसरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. गेल्या महिन्यात २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई ठप्प झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून उपनगर परिसरात वादळी वाऱ्यांसह पाऊस होताना पाहायला मिळत आहे.