मुंबई : जवळपास चौदा दिवस रेंगाळलेल्या मोसमी वाऱ्यांनी जोरदार मजल मारत राज्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक भागांत रविवारी संततधार पाऊस सुरू होता. सोमवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस मुक्कामी राहणार आहे.

रविवारी विदर्भातील उत्तरेचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी वारे पोहोचले होते. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथे उष्णतेची लाट सुरू असून मोसमी वारे येत्या आठवडाभरात दिल्लीपर्यंत प्रवास करतील. दिल्लीत २९ जून ते १ जुलै दरम्यान मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शनिवारीही कोकण परिसरात जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात रायगड येथील श्रीवर्धन येथे २३७ मिमी तर म्हसळा येथे १७० मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरीमध्ये १६६ मिमी, गुहागर येथे तब्बल २४८ मिमी, हर्णे येथे १६६ मिमी तर पालघरमध्ये ११३ मिमी आणि देवगड येथे १२० मिमी पाऊस पडला.

आतापर्यंत राज्यातील सर्वाधिक पाऊस सिंधुदूर्ग येथील मालवण व देवगड येथे झाला आहे. अहमदनगर येथे ५० मिमी तर धुळे येथील साकरी येथे ६० मिमी पावसाची नोंद झाली. औंरगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाड येथेही बहुतांश ठिकाणी पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी आल्या. विदर्भात शनिवारी फारसा पाऊस पडला नाही मात्र येत्या काही दिवसात विदर्भात हलक्या ते मध्यम  स्वरुपाच्या पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे.

मुंबईत सरासरी ओलांडली..

या महिन्यात अवघे चार दिवस पडलेल्या पावसाने मुंबईतील जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. १९८१ ते २०१० या तीस वर्षांतील सरासरीनुसार जूनमध्ये मुंबईत ४९३ मिमी पाऊस पडतो. २४ जून रोजी दुपारी साडेपाच वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे ५४० मिमी तर कुलाबा येथे ६०८ मिमी पावसाची नोंद झाली.