मुंबई व परिसराला मंगळवारी पहाटेपासून पावसाने अक्षरश झोडपून काढले. मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांत पावसाची संततधार सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे, कांजूरमार्ग,  पवई परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड परिसरात पावसाची रिमझिम सूरू आहे. मुंबईची ‘लाईफलाईन’ असलेल्या रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला असून, पश्चिम रेल्वेची वाहतूक तीस मिनिटे उशीराने सुरू आहे. कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यान पाणी साठल्यामुळे हार्बरवर सीएसटी ते पनवेल मार्गावरील लोकल वाहतूक मंगळवारी दुपारी बंद करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रवासाच्या अडचणींमध्ये भर पाडत आहेत. सांताक्रूझच्या लिंकीग मार्गावर तसेच भांडूपच्या एलबीएस मार्गावर पाणी साचले असल्यामुळे वाहतूकीची कोंडी झाली आहे. त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या वाहतुकीलाही ‘ब्रेक’ लागला आहे.
दादरच्या हिंदमाता, परळ, कुर्ला परिसरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.  तसेच ऐन पावसात मुंबईच्या समुद्रात ४.८८ मीटरच्या लाटा उसळल्यामुळे मुंबापुरीची रुपांतर काही भागांत तुंबापुरीमध्ये झाले आहे.
राज्यातही मुसळधार
राज्यातील परिस्थितीही काही वेगळी नाही. चंद्रपुरात सोमवारी दिवसभरात ‘टाईम प्लीज’ घेतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा रौद्र रुप धारण केले. इरई धरण भरल्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. त्यामुळे चंद्रपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तर गडचिरोलीच्या सिरोंचा गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातही पावसाचे धुमशान सुरू आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचीही वाहतूकही मंद गतीने सुरु आहे.   
दुष्काळी सोलापूरातही जोरदार पाऊस सुरू आहे. एकंदर सध्याच्या परिस्थितीवरून आजचा मंगळवार मुसळधार राहण्याचीच चिन्हे आहेत.