कालपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस पडतो आहे. २९ ऑगस्टला घेतलेल्या अनुभवानंतर आज मुंबईकरांनी घरीच बसणे पसंत केले. त्यामुळे आज कोणताही मोठा अनुचित प्रसंग उदभवला नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा रेल्वे स्थानकातील आहे.

काल दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नालासोपारा स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरूवात झाली होती. आज सकाळपर्यंत या पाण्याची पातळी जवळपास फलाटाच्या उंचीपर्यंत पोहोचली होती. यावेळी अनेक प्रवासी फलाटावर ट्रेनची वाट पाहत उभे होते. मात्र, त्याचवेळी एक एक्स्प्रेस गाडी स्थानकाच्या परिसरात होती. ट्रॅक पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील ट्रेन खूप धीम्या गतीने चालत होत्या. गाडी रूळावरून घसरून अपघात घडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात होती. मात्र, नालासोपारा स्थानकातील एक्स्प्रेस गाडीच्या मोटारमनने मागचापुढचा कोणताही विचार न करता नेहमीच्या वेगाने गाडी स्थानकातून बाहेर काढली. यावेळी गाडीचा वेग साधारण ताशी १०० किलोमीटरच्या आसपास असेल, असे काही प्रवाशांनी म्हटले आहे. इतक्या वेगामुळे ट्रॅकवरील पाणी प्रचंड वेगाने फलाटावर फेकले जात होते. थोड्या काळासाठी या ठिकाणी जणू काही एखाद्या वॉटर राईडचा अनुभव घेत आहोत, असे फलाटावरील प्रवाशांना वाटले. इतक्या वेगाने पाणी अंगावर आलेले पाहून सुरूवातील अनेकजण घाबरलेही. अनेकांनी पाणी उडायला लागल्यानंतर स्वत:चा बचाव करण्यासाठी आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघताना एकप्रकारचे थ्रिल किंवा मज्जा वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली असती, अशा प्रतिक्रिया या व्हिडिओच्या पोस्टवर येताना दिसत आहेत.