पावसामुळे मुक्काम वाढला

दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाल्यामुळे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तसेच घरांतील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मंगळवारऐवजी बुधवारी करण्याचा निर्णय घेतला. मात्र काही भाविकांनी पावसाचा जोर कमी होताच मंगळवारी सायंकाळनंतर गणेश विसर्जनासाठी चौपाटी, तलाव आणि कृत्रिम तलावांच्या दिशेने जायला सुरुवात केली होती. विसर्जन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराच्या जीवरक्षकांबरोबर खासगी संस्थांचे जीवरक्षकही समुद्रामध्ये सज्ज होते.

मुसळधार पाऊस, सोसाटय़ाचा वारा आणि खवळलेला समुद्र अशा परिस्थितीतही मंगळवारी सायंकाळी पावसाचा जोर कमी होताच पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने भाविक निघाले होते. तसेच अन्य विसर्जनस्थळीही विसर्जन सोहळा सुरू झाला होता. मात्र खवळलेल्या समुद्रामध्ये भाविकांनी उतरू नये, गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेचे स्वयंसेवक आणि जीवरक्षकांकडे द्यावी, असे आवाहन पालिकेकडूून करण्यात आले होते. त्यानुसार भाविक चौपाटीवर पोहोचल्यानंतर आरती करून गणेशमूर्ती पालिकेचे स्वयंसेवक आणि जीवरक्षकांकडे सुपूर्द करताना दिसत होते.

भाविकांनी खवळलेल्या समुद्रामध्ये उतरू नये असे आवाहन ठिकठिकाणच्या चौपाटीवर करण्यात येत होते. तसेच चौपाटी आणि अन्य ठिकाणच्या विसर्जनस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी विसर्जनस्थळी भाविकांना समुद्र अथवा तलावात उतरू नये असे आवाहन करीत होते. तसेच संततधार कोसळणारा पाऊस आणि खवळलेला समुद्र यामुळे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पाच दिवसांच्या गणपतीचे बुधवारी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता.

दादर, माटुंगा आणि आसपासच्या परिसरातील भाविक गणेश विसर्जनासाठी दादर चौपाटीवर येतात. दादर टीटी, हिंदमाता, माटुंगा आदी परिसरातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे विसर्जनासाठी दादर चौपाटीवर पोहोचणे अशक्य बनले होते.