मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील अनेक ठिकाणी पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विट करत नागरिकांना आवाहन केलं आहे. “मुंबईकरांनी घरातच थांबावं अशी आमची विनंती आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. सर्व काळजी घ्या आणि समुद्रकिनारी किंवा पाणी भरलेल्या परिसरात जाऊ नका. गरज लागल्या १०० नंबरवर फोन करा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई तसंच इतर ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.

आदित्य ठाकरे यांचंही आवाहन
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील लोकांना घरातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सर्वांनी घरातच थांबावं अशी विनंती आहे. मुंबईत वेगवान वारा आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. माझी सर्वांना आणि खासकरुन पत्रकारांना सुरक्षित राहण्याची विनंती आहे. जिथे आहा तिथेच थांबा”.

पश्चिम रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायरवर झाड पडलं
मुसळधार पाऊस तसंच चर्चगेट, मुंबई सेंट्रल आणि मरिन लाइन्स ते चर्नी रोड दरम्यान ट्रॅकजवळ झाडांच्या फांद्या असल्याने विशेष ट्रेन सेवा मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरम्यान चर्चगेट-मरीन लाइन्सच्या मध्यभागी १ आणि २ नंबरच्या ट्रॅकवरील रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने आगीचा भडका उडाला होता.

मध्य रेल्वेचा खोळंबा
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील सीएसएमटी-वाशी आणि सीएसएमटी-कुर्ला दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

मुंबईतील पावसाची नोंद
सकाळी ८.३० ते ५.३० दरम्यान कुलाबा वेधशाळेत २२.९ सेमी तर सांताक्रूझमध्ये ८.८ सेमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या ताशी ७० किमी वेगाने वारे वाहत असून पुढील तीन ते चार तास परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.