चारा छावण्या, टँकरच्या मागणीत घट; धरणांचा साठा ५४ टक्क्यांवर
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात ५४ टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. अजूनही परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे पुढील जूनपर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच चारा छावण्या आणि टँकरच्या मागणीतही घट झाली असून सरकार आणि जनतेला दिलासा देणारी ही बाब आहे. अजूनही काही जिल्ह्य़ात पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाण्याची समस्या असली तरी त्याचा फारसा फटका बसणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात दिली.
मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्य़ांसह सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीक-पाण्याच्या आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे. प्रारंभी पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असले तरी सध्या पडत असलेल्या पावसामुळे सुमारे ७० लाख हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचा अंदाज असून त्यातून रब्बी पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ होईल. जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे पाणीसाठा आणि सिंचन क्षमतेत वाढ झाली असली तरी यातून नेमका किती पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, याचा आकडा लवकरच कळेल.
ज्या जिल्ह्य़ात रब्बीची पिके घेतली जात नाहीत अशा जिल्ह्य़ातही रब्बी पीक घेण्यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर ठिकाणीही पाण्याच्या परिस्थितीत मोठा बदल होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुरांसाठी उघडलेल्या चारा छावण्या बंद होऊ लागल्या असून पाणीपुरवठय़ासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरची संख्याही कमी होत आहे. काही गावात चाराटंचाई असली तरी याच गावांच्या जिल्हय़ात इतरत्र उपलब्ध असणाऱ्या चाऱ्यामुळे बाहेरून चारा मागविण्याची वेळ येणार नाही. अजून परतीचा पाऊस बाकी असल्याने या परिस्थितीत अधिक सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नवीन जलस्रोत निर्माण करण्यापेक्षा जुन्या स्रोतांची दुरुस्ती व सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत चांगले काम होईल. तसेच स्वयंचलित हवामान केंद्रे लवकर सुरू व्हावीत यासाठी कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश तत्पूर्वी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले.

तलाव क्षेत्रातील साठय़ात आणखी भर!
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सोमवारीही पावसाचा मुक्काम कायम होता. रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर ओसरला असला तरी सोमवारी दिवसभरात नऊ दिवसांच्या पाण्याची भर तलावात पडली. मुंबईकरांना पुढील वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी आता आणखी ३० दिवसांच्या पाण्याची गरज आहे. त्यानंतर मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होऊ शकेल.
गेले दोन-तीन दिवस मुंबई, तसेच तलाव क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे तलावांमध्ये आता २९५ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेले दोन दिवस तलाव क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी काही अंशी ओसरला होता. मात्र दिवसभर पडलेल्या रिमझिम पावसामुळे आणखी नऊ दिवसांच्या पाण्याची तलावात भर पडली आहे.
भातसा धरणातून मुंबईला प्रतिदिन १०५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. भातसा धरणक्षेत्रात सोमवारी सुमारे ६९ मि.मी., तर तानसा आणि विहार तलावक्षेत्रात प्रत्येकी ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर इतरही धरणक्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी लक्षणीय होती.
सोमवारी सकाळी ६ वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तलावांमध्ये ११,०७,४११ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले आहे.

अनेक ठिकाणी जूनपर्यंत पुरेल इतका साठा
गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक जिल्ह्य़ातील संभाव्य पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत झाली आहे. बहुतांश जिल्ह्य़ांत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे, तर दुष्काळी भागातील स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून या भागातही मार्चपर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. राज्यातील धरणांच्या पाणीसाठय़ातही वाढ होत असून सध्या ५४ टक्के धरणे भरली आहेत. त्यामध्ये कोकणातील धरणे ८८ टक्के भरली असून नागपूर विभागातील धरणेही ७९ टक्के भरली आहेत. विशेष म्हणजे मराठवाडय़ातील धरणांमध्ये १३ टक्के पाणी साठले असून जायकवाडी प्रकल्पातील साठा सव्वाचार टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जालना जिल्ह्य़ातील गलाटी धरण प्रथमच ७० टक्के इतके भरले आहे.