राज्याच्या वेगवेगळया भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत वडाळा येथे रस्ता खचून सात गाडयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असताना आता रायगड जिल्ह्यात कर्नाळा येथे पूल खचल्याची घटना घडली आहे.

पूल खचल्यामुळे मागच्या तीन तासांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे आता वाहने पर्यायी मार्गावरुन वळवण्यात आली आहेत.

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जिल्ह्याच्या वेगवेगळया भागांमध्ये पेण १६० मिमि अलिबाग १५६ मिमि, पनवेल १५८ मिमि, उरण १०६ मिमि, सुधागड १३० मिमि, माथेरान १५५ मिमि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

रायगड शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सरासरी एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळात ( एक जून ते २५ जून ) दरम्यान पडलेल्या पावसाच्या दुप्पट पाऊस कोसळला आहे.