काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस परतीच्या वाटेवर मात्र राज्यभर दमदार कामगिरी करत आहे. तहानलेल्या मराठवाडय़ातही मुसळधार पाऊस होत असून तिथे अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मुंबईतही गुरुवारी सकाळी झालेल्या पावसाने तापमानात घसरण झाली आणि गेले काही दिवस घामात भिजून निघालेल्या मुंबईकरांना आल्हाददायक अनुभव मिळाला.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तसेच केरळ ते कोकणदरम्यान पश्चिम किनारपट्टीवरही तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. विदर्भ आणि कोकणात यावर्षी सुरुवातीपासून मोठा पाऊस पडत असला तरी मराठवाडय़ात मात्र तुलनेने कमी पाऊस पडला होता. मात्र जाता जाता पावसाने मराठवाडय़ात जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी कुलाबा येथे ५७ मिमी तर सांताक्रूझ येथे २७ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व परिसरात संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस वीजांसह पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
तापमान घसरले
गेले काही दिवस उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरुवारी सकाळी बरसलेल्या पावसाने दिलासा दिला. दिवसभर तापमानाचा पारा चढलाच नाही. कुलाबा येथे २६ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे २७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमान अनुक्रमे २१.८ अंश से. आणि २२.४ अंश से. होते. दोन्ही केंद्राजवळ आद्र्रता ९० ते १०० टक्क्य़ांदरम्यान असली तरी तापमान कमी राहिल्याने बाष्पाचा प्रभाव जाणवला नाही.
 मान्सूनचा परतीचा प्रवास पुढे..
राजस्थानच्या काही जिल्ह्य़ांमधून ९ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू केलेल्या पावसाने गुरुवारी जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणाचा काही भाग तसेच कच्छच्या काही भागातून माघार घेतली आहे.