|| सुशांत मोरे

पाऊस, पूरजन्य स्थिती, तांत्रिक बिघाडाचा मध्य रेल्वेला फटका; ३६ लाख प्रवाशांना मनस्ताप

पाऊस, पूरजन्य परिस्थिती आणि त्यात उद्भवणारे तांत्रिक घोळ यांमुळे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मध्य रेल्वेच्या लोकल व लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या वेळापत्रकाची ऐशीतैशी झाली. या दोन महिन्यांत लोकलच्या तब्बल नऊ हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर आदी लांब पल्ल्याच्या ९०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. लोकल व लांब पल्ल्याच्या मिळून सुमारे ३६ लाख प्रवाशांना या गोंधळाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. प्रवाशांना तिकिटांचा परतावा मिळाल्याने थोडाफार दिलासा तरी मिळाला. परंतु रोजच्या रोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘विनापरतावा’ दररोज रडतरखडत चालणाऱ्या गाडय़ांतून घर ते कार्यालय असा प्रवास करण्याशिवाय तरणोपाय नव्हता.

दरवर्षी मध्य रेल्वेकडून पावसाळापूर्व नियोजन केल्याचा दावा केला जातो. त्यासाठी लाखोंच्या खर्चाचे आकडे दाखविले जातात. मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हा दावा फोल ठरतो. यंदा १ जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे कुर्ला ते विद्याविहारसह अन्य स्थानकांत मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आणि लोकल सेवा ठप्प झाली. कर्जत ते लोणावळा पट्टय़ातही दरड कोसळण्याच्या घटनेमुळे मेल-एक्स्प्रेस गाडय़ांवर परिणाम झाला. त्यानंतर एक दिवस मध्य रेल्वेने कामाच्या पहिल्या दिवशी ब्लॉकचे वेळापत्रक लागू केल्याने वेळापत्रक विस्कळीत झाले.

जुलैच्या अखेरीसही पावसामुळे पुन्हा दाणादाण उडाली. बदलापूर ते वांगणी यासह आणखी काही स्थानकांत साचलेल्या पाण्यामुळे लोकल सेवा ठप्पच झाली. त्यापाठोपाठ मुंबई ते पुणे रेल्वे सेवेचा जो बोजवारा उडाला, तो ऑगस्ट महिन्यातही सुरूच आहे. यात कोल्हापूर, सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे पुरती कोलमडली. पावसामुळे मध्य रेल्वेला काही तांत्रिक बिघाडांनाही सामोरे जावे लागले. इंजिन, लोकल, सिग्नल यांसह अनेक बिघाड सातत्याने होत राहिल्याने वेळापत्रकच कोलमडले.

या सर्व गोंधळामुळे जुलै व ऑगस्ट महिन्यात ९ हजार लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यात ६ हजार ३२२ फेऱ्या जुलै महिन्यातील असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. ९२३ मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर्स गाडय़ाही रद्द करण्यात आल्या. अचानक रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. लोकलच्या व लांब पल्ल्याच्या मिळून एकूण ३६ लाख ६९ हजारपेक्षा जास्त प्रवाशांना गाडय़ा रद्द झाल्याने फटका बसला. या गोंधळामुळे मध्य रेल्वेला १३ कोटींहून अधिक महसुलावर पाणी सोडावे लागले.

पश्चिम रेल्वेच्या सुरत-वडोदरालाही फटका

पश्चिम रेल्वेवरील सुरत ते वडोदरा भागांत पडलेल्या मुसळधार पावसामुळेही रेल्वे रुळांवर पाणी साचले व रुळांना मोठा धोका पोहोचला. त्यामुळे या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाडय़ांवर ३१ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत मोठा परिणाम झाला. पश्चिम रेल्वेवरील मुंबईतून सुटणाऱ्या व येणाऱ्या तसेच अन्य भागांतूनही विविध ठिकाणी जाणाऱ्या ३६५ मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर्स गाडय़ांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी २ लाख ८३ हजार ५५५ प्रवाशांना एकूण १० कोटी रुपयांचा तिकिटांचा परतावाही द्यावा लागला.

कोटय़वधींचा परतावा

मध्य रेल्वेला जुलै महिन्यात मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना ५ कोटी ६० लाख रुपये इतका परतावा द्यावा लागला, तर ऑगस्ट महिन्यात प्रवाशांना ७ कोटींहून अधिक तिकिटांचा परतावा द्यावा लागला.