मुंबई आणि उपनगरांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरासह कोकण किनारपट्टी, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेत ४१.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर कुलाबा वेधशाळेत ६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेत १ जूनपासून झालेल्या पावसाची नोंद पाहता यावेळी सामान्य पाऊस पडला आहे.

१ जुनपासून कुलाबा वेधशाळेत एकूण २३४६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा सरासरीपेक्षा ५०० मिमी जास्त आहे. तर सांताक्रूझमध्ये एकूण ३३९८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा हा आकडा १३५३.४ मिमी जास्त आहे.

हवामान विभागाचे (पश्चिम विभाग) उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुढील २४ तासांत मुंबईसह ठाण्याजवळील परिसरांमध्येही मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे”.