21 September 2020

News Flash

सागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित

महापालिकेचे नियोजन यशस्वी; लाटांच्या माऱ्यातही नुकसान टळले

महापालिकेचे नियोजन यशस्वी; लाटांच्या माऱ्यातही नुकसान टळले

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसाने बुधवारी दक्षिण मुंबईत हाहाकार उडाला. असे असताना मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या कामाला मात्र धक्काही बसला नाही.

गेल्या वर्षी लाटांच्या तडाख्यात वाहून गेलेल्या भरावाचा अनुभव गाठीशी असल्याने या वर्षी आवश्यक ठिकाणी बसविलेले पाणी उपसा करणारे अतिरिक्त २५ पंप आणि लाटांपासून बचावासाठी सिमेंटच्या दगडांची (ट्रायपॉड) केलेली व्यवस्था यामुळे आतापर्यंत केलेले काम सुरक्षित असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी झालेले नुकसान लक्षात घेऊन पालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वीच प्रियदर्शनी पार्क, अमरसन्स गार्डन, वरळी, मरिन ड्राइव्ह येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठमोठे सिमेंटचे दगड रचून घेतले. लाटांच्या तडाख्यात भरावाला धक्का बसू नये म्हणून ही काळजी घेण्यात आली. त्याचबरोबर काम सुरू असलेल्या ठिकाणी अतिरिक्त २५ पाणी उपसा करणारे पंपही बसविले. परिणामी, कार्यस्थळाच्या आसपास साचणाऱ्या पाण्याचा पंपाच्या साह्य़ाने झटपट निचरा करता आला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा दिलेला इशारा लक्षात घेऊन मंगळवारी आणि बुधवारी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम बंदच ठेवण्यात आले होते.

किनाऱ्यावर सोसाटय़ाचा वारा वाहण्याच्या शक्यतेमुळे क्रेन आणि अन्य सामग्री सुरक्षित स्थळी बंद करून ठेवण्यात आली होती. वाऱ्याचा वेग समजावा यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी यंत्रणा बसविण्यात आली असून बुधवारी या परिसरात प्रतितास ८० कि.मी. वेगाने वारा वाहत होता. मात्र आधीच उपाययोजना केल्यामुळे यंदा नुकसान टळले, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलमय

मुंबई शहरात बुधवारी ३०० मि.मी.हून अधिक पाऊस पडला.  शहरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पाऊस पडल्यानंतरही पाणी न साचणाऱ्या नरिमन पॉइंट, चर्चगेट, गिरगाव आदी परिसरही जलमय झाले. भरतीमुळे समुद्राच्या पाण्याने रस्त्यावर मुसंडी मारली. पावसाच्या तडाख्यात अवघी दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईत पाणीच पाणी झाले.

हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन मंगळवार, बुधवारी  सागरी किनारा मार्गाचे काम बंद ठेवण्यात आले होते. आधीच काळजी घेतल्यामुळे सागरी मार्गाच्या कामाचे नुकसान झाले नाही.

– विजय निघोट, प्रमुख अभियंता, सागरी किनारा मार्ग प्रकल्प

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 2:53 am

Web Title: heavy rain not damage work of mumbai coastal road project zws 70
Next Stories
1 रेल्वे-बेस्टला फटका
2 शार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ
3 पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचा करोनाने मृत्यू
Just Now!
X