मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव आदी भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तसंच पवई, घाटकोपर, कुर्ला, दादर, वरळी या भागांमध्येही जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, काही मिनिटांच्या पावसातच सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, भाऊदाजी रोडमार्गे सायनकडे जाणाऱ्या बसेस महेश्वरी उद्यानाकडून सायन रूग्णालयाकडे वळवण्यात आल्या आहेत. तर सायन रोड क्रमांक 24- सायन स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस सायन रोड क्रमांक 3 वरून वळवण्यात आल्या आहेत.

18 ते 21 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. तसंच बुधवारी रात्रीही मुंबई आणि आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती. गुरूवारसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर मुंबईत, ठाणे आणि कोकणातील शाळांना तसंच महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु गुरूवारी पावसाने अनेक ठिकाणी दडी मारल्याचं दिसून आलं होतं.

प्रादेशिक हवामान विभागाकडून गुरूवारी दुपारी रेड अलर्ट मागे घेण्यात आला होता. त्यानंतर काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसंच शुक्रवारसाठीही हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला होता. पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हवामान विभागाकडून गुरूवारसाठी देण्यात आलेला इशारा सर्वांनी गांभीर्याने घेतला होता. परंतु गुरूवारी अनेक ठिकाणी पाऊसच न झाल्यानं हवामान विभागावर अनेकांनी टीका केली.