विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरत पावसाने मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गणपती आगमनाच्या पूर्वसंध्येला पावसाचे मुंबईसह राज्यात पुर्नरागमन झाले. गेल्या २४ तासांत राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत सोमवारी दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला. त्यानंतर सकाळीही पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली भिवंडी, नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. मध्य रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला असून, रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गोंदियातही मुसळधार हजेरी

गोंदिया जिल्ह्यात सोमवारी मुसळदार पाऊस झाला. दोन तास सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव भागात पाणी साचलं. या तालुक्यात असलेल्या केशोरी गावाजवळील धोबी नाल्यावरच्या पुलावरून २ ते ३ फूट पाणी असल्यानं नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे पुलावरील वाहतूकही बंद झाली असून चार गावांचा संपर्क तुटलेला आहे.