पावसाचा पहिला महिना कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुन्हा एकदा पावसाच्या आशा पल्लवित होण्यासारखी परिस्थिती आहे. दोन वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या भागांमध्ये पावसाची चाहूल लागत आहे. पूर्व-पश्चिम किनारपट्टी व उत्तर भारतात पाऊस सुरू असून रविवारी, ३ जुलैपासून राज्याच्या अंतर्गत भागातही मध्यम स्वरूपाच्या सरी येण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला.

विलंबाने आलेल्या पावसाने उत्तर भारतात आघाडी उघडली आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मात्र ढगांनी गर्दी करूनही पावसाच्या सरींसाठी मात्र अजूनही प्रतीक्षा संपलेली नाही. उत्तरेत राजस्थान, मध्य प्रदेशपासून ओडिशापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाकडे सर्व ढग सरकल्याने इतर भागांमधील पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यामुळे अजूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाच्या तुरळक सरीच आल्या. ३ जुलैनंतर मात्र ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे. रविवारपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू होणार नसला तरी मध्यम स्वरूपाच्या सर्वदूर सरी येण्याचा अंदाज आहे.

कोकणात सुरू असलेल्या सरी कमीअधिक प्रमाणात सुरूच राहतील. गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीनजीक कमी दाबाचा पट्टा असून नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांसोबत भरपूर बाष्प येत असल्याने मुंबईसह कोकणच्या इतर जिल्ह्य़ांमध्येही पाऊस पडत आहे. हर्णे, पालघर, म्हसळा, मुरुड, दापोली, गुहागर, खेड, रत्नागिरी आणि वैभववाडीतील देवगड वगळता सर्व जिल्ह्य़ांमध्ये पावसाने एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.