|| प्रसाद रावकर

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा निर्णय

पावसामुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती, सावधगिरीची सूचना आदींबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने आता ट्विटर आणि रेडिओ चॅनलचा आधार घेतला आहे. मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती ट्विटरवर देण्यास आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सुरुवात केली आहे. मुंबईकरांनी आपल्या मोबाइलमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे ट्विटर डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

गेले तीन दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असून मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे. मुंबईत मंगळवारी सकाळी पावसाचा मुक्काम कायम होता. मात्र दुपारनंतर अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईमध्ये पावसामुळे अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर अफवा पसरतात. आता ल्व्हॉटस्अ‍ॅपमुळे अफवांचे संदेश झपाटय़ाने पसरतात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होते. मुसळधार पाऊस पडल्यानंतरही अनेक चुकीचे संदेश समाजमाध्यमांवरून पसरले जातात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होते.

पावसाळ्यात मुंबईकरांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी आता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ट्विटरचा आधार घेतला आहे. मुंबईत कोणत्या भागात पाऊस कोसळत आहे, कोणत्या भागात पाणी साचले आहे, वाहतूक कोणत्या रस्त्याने वळविण्यात आली आहे, हवामानाचा अंदाज आदी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या ट्विटरवर देण्यात येत आहे. मुंबईमध्ये बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामधील मोठय़ा स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेतील आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकारी अखंडपणे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणावर लक्ष ठेवून असतात. पावसाळ्यात रस्त्यावर साचलेले पाणी, होणारी वाहतूक कोंडी, घडणारी दुर्घटना या सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास येते. मात्र ही ताजी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा पालिकेकडे नव्हती. त्यामुळे आता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ट्विटरचा आधार घेतला आहे. हवामानाचा अंदाज, पावसाची स्थिती, घडलेले अपघात, वाहतुकीचे नियम आदींबाबतची माहिती ट्विटरवरून देण्यात येत आहे.

नागरिकांनी मोबाइलमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे ट्विटर खाते फॉलो करावे. त्यामुळे पावसाळ्यातील घडामोडींची ताजी माहिती तात्काळ उपलब्ध होईल.   – महेश नार्वेकर, विभागप्रमुख, आपत्कालीन व्यवस्थापन