पावसामुळे मध्य, पश्चिम मार्गावरील वाहतुकीचे तीनतेरा; लोकलच्या २७७ फेऱ्या रद्द; ठाणे ते सीएसएमटी प्रवासासाठी अडीच तास; विरार ते भाईंदर सेवा दहा तासांपेक्षा अधिक काळ बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल

पावसाचा रुद्रावतार आणि भरतीची वेळ यामुळे मंगळवारी सकाळी अवघी मुंबई जलमय होऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मार्गही पाण्याखाली गेले. त्यातच सिग्नल तसेच रुळांमधील तांत्रिक बिघाड या कारणांमुळे उपनगरी रेल्वेसेवा मंगळवारी दिवसभर विस्कळीत होती. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने वाहतूक सुरूच ठेवली असली तरी, रूळ पाण्याखाली गेल्याने गाडय़ा अतिशय संथगतीने सुरू होत्या. या ‘जल’वाहतुकीमुळे एकीकडे ठाणे ते सीएसएमटीपर्यंतच्या प्रवासासाठी अडीच तास मोजावे लागले असताना पश्चिम रेल्वेवर भाईंदरपासून ते विरापर्यंतची वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत बंदच होती.

पावसाने सोमवारी दुपापर्यंत लोकल प्रवाशांना वेठीस धरल्यानंतर वाहतूक सुरळीत राहिली. हाच अंदाज घेऊन मंगळवारी नोकरदार मंडळी घराबाहेर पडली. मात्र, मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा पूर्णपणे कोलमडून गेली. पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा, वसई, विरार स्थानकांदरम्यान साचलेल्या पाण्यामुळे लोकल गाडय़ा पुढे सरकू शकत नव्हत्या. नालासोपारा स्थानकात रुळांवर तब्बल फूटभर पाणी साचले होते. त्यामुळे या भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन वसई रोड स्थानक ते विरार दरम्यानच्या लोकल सेवा सकाळी साडेसातपासून बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. त्यामुळे कामावर जाण्यासाठी स्थानकात आलेल्या प्रवाशांनी पुन्हा घराची वाट धरली. चर्चगेट ते वसईदरम्यान रुळांवर लोकलगाडय़ा एकापाठोपाठ अडकू नयेत, यासाठी अनेक लोकलफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचवेळी वसई रोड स्थानक हद्दीतील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वसई ते भाईंदरदरम्यानची लोकलसेवाही बंद पडली. सोमवारप्रमाणे दुपारनंतर रुळांवरील पाणी ओसरेल, अशी आशा होती. परंतु, सायंकाळी चार वाजेपर्यंत नालासोपारा ते वसई रोड स्थानकांदरम्यानच्या रुळांवरील पाणीपातळीत आणखी वाढ झाली. जवळपास दोन फूट पाणी येथे साचल्याने रेल्वे वाहतूक बंदच ठेवण्यात आली. याचा परिणाम चर्चगेटपर्यंत येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावरही झाला.

मध्य रेल्वे पूर्णपणे बंद पडली नसली, तरी येथेही वाहतूक विस्कळीत होती. शीव, माटुंगा, दादर, परळ, करीरोड, चिंचपोकळी ही स्थानके पाण्याने तुंबली होती. त्यामुळे लोकलगाडय़ांचा वेग कमी झाला. दादर स्थानकाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तर सर्व मार्गावरील लोकल गाडय़ांचा बोजवाराच उडाला. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे विद्याविहार ते भायखळा स्थानकांपर्यंत जवळपास आठ लोकल गाडय़ांचा वेग फारच कमी झाला.

त्यामुळे मागून येणाऱ्या अन्य लोकल गाडय़ाही जागेवरच थांबल्या. परिणामी ठाणे ते सीएसएमटीपर्यंत धीम्या लोकल गाडीच्या एक तासाच्या प्रवासासाठी मंगळवारी अडीच तास मोजावे लागत होते. दुपारी चार वाजेपर्यंत हीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचाही सामना करावा लागत होता.

मुख्य मार्गाबरोबरच हार्बरवरील वाशी ते मानखुर्द दरम्यानही सकाळी ११.३० वाजता रुळावर पाणी साचले होते. दुपारी बारानंतर या दरम्यानचे पाणी कमी झाल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत झाली. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास वडाळा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि हार्बरवरील लोकल सेवेचा पुन्हा बोजवारा उडाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अर्धा तास लागला.

दावा फोलच

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पावसापूर्व कामे करण्यात येतात. नालेसफाईबरोबरच रूळ आणि त्या हद्दीतील सफाई, सिग्नल, ओव्हरहेड वायर, लोकल गाडय़ांमधील दुरुस्ती इत्यादी कामे केली जातात. मात्र ही कामे करूनही रुळांवर पाणी साचते. यंदाही मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांत रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. परिणामी लोकल फेऱ्या रद्द करून सेवा देणे रेल्वेला भाग पडले. त्यामुळे पावसाळापूर्व कामांचा केलेला दावा मात्र फोल ठरलेलाच दिसून येतो.

प्रवासी रुळांवर

मध्य रेल्वेवरील लोकल गाडय़ा बऱ्याच वेळानंतर पुढे सरकत असल्याने अनेक प्रवाशांनी रुळावर उतरून पुढील स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. रुळावर असलेल्या पाण्यातून चालत प्रवासी पुढचे स्थानक गाठत होते.

‘बेस्ट’ अन्य मार्गाने दादर, परळ,एल्फिन्स्टन, वडाळा, सांताक्रुझ, चेंबूर या भागात साचलेल्या पाण्यामुळे बेस्ट बस गाडय़ा अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. जवळपास ९० पेक्षा जास्त  फेऱ्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्याचे बेस्टने सांगितले.