• शीव-कुर्ला रेल्वे मार्गावर पाणी; मध्य, हार्बरच्या प्रवाशांचे हाल
  • रस्ते वाहतूकही बंद, ठिकठिकाणी कोंडी
  • राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरही परिणाम

झोडपून काढणाऱ्या पावसाने शनिवारी मुंबईला पुरते ठप्प केले. अनेक रस्त्यांवर पाणी साचले. वाहतूक खोळंबून मुंबईकरांची ठिकठिकाणी कोंडी झाली. शीव-कुर्ला आणि चुनाभट्टी-कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यानचा रेल्वेमार्ग पाण्याखाली गेला. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक बंद पडली. ग्रँट रोड स्थानकात ओव्हरहेड वायरवर फांदी पडल्याने पश्चिम रेल्वेही विस्कळीत झाली.

रस्त्यांवर पाणी साचल्याने बेस्टच्या अनेक बसगाडय़ा बंद पडल्या. रेल्वे वाहतूक बंद पडल्याने आणि बेस्टगाडय़ा कोंडीत अडकल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मुंबई विमानतळावरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवांवरही परिणाम झाला.

ठाणे, पालघर आणि रायगडलाही पावसाने झोडपले. तेथील जनजीवन पार विस्कळीत झाले. या जिल्ह्य़ांतील जवळजवळ सर्व नद्यांना पूर आला असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्य़ातील अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, मुंब्रा पोलीस ठाण्याजवळील एका बेकरीची चिमणी कोसळल्याने एकजण गंभीर जखमी झाला.

या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती शनिवारी दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी आली. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत होता. भरतीच्या पाण्यामुळे काही ठिकाणी रेल्वेमार्ग आणि रस्ते पाण्याखाली गेले. आज, रविवारी ४ ऑगस्टलाही दुपारी अडीच वाजता भरती येणार असून या वेळी ४.८३ मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असा इशारा देण्यात आला आहे.

आणखी पाच दिवस जोरदार..

  • चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात अतिवृष्टी ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.
  • हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ४ ऑगस्टला कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
  • रविवारी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्य़ांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असल्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यभर कहर

राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाने शनिवारी कहर केला. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या, तर मराठवाडय़ातही पावसाची दमदार हजेरी होती. कोकण, मध्य महाराष्ट्रात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस असल्याने बहुतांश धरणे भरली  आहेत.