करोनाबाधितांसह अन्य रुग्णांचेही हाल

मुंबई : रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे  मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात करोना संशयितांच्या बाह्य़रुग्ण विभागात बुधवारी सकाळी पाणी साचल्याने येथील कर्मचाऱ्यांसह रुग्णांचीही तारांबळ उडाली. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरल्याने करोनाबाधितांसह बिगरकरोना रुग्णांनाही रुग्णालयात पोहोचण्यास कसरत करावी लागली.

नायर रुग्णालयाबाहेरील रस्त्यावर बुधवार पहाटेपासून पाणी साचायला लागले. नायर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच तंबूमध्ये करोना संशयितांच्या चाचण्यांसाठी बाह्य़रुग्ण विभाग सुरू केलेला आहे. येथे तपासणीसह करोना चाचणीही केली जाते. सकाळी पाण्याची पातळी वाढून रुग्णालय परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. तंबूमधील बाह्य़ रुग्ण विभागातही पाणी शिरले. विभागात रुग्णांची गर्दी विशेष नसली तरी औषधे, तपासणीची वैद्यकीय सामग्री भिजायला लागल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. बाह्य़रुग्ण विभाग सध्या आपत्कालीन विभागात हलविलेला आहे. तेथे चाचण्या सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. रुग्णालय आवारात कमरेभर पाणी भरल्याने निवासी डॉक्टरांना रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करावा लागला. रुग्णालयाबाहेर जाणे शक्य नसल्याने रात्रपाळीचे काही कर्मचारी पुढील पाळीत काम करत असल्याचे मार्ड प्रतिनिधींनी सांगितले.

डॉक्टरांना रुग्णालयापर्यंत पोहोचता आले तरी करोनाबाधित आणि संशयित रुग्णांना मात्र रुग्णालयात जाण्यास चांगलीच कसरत करावी लागली. कस्तुरबा रुग्णालयाकडे जाणाऱ्या साने गुरुजी मार्गावर पाणी साचल्याने रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाणी भरल्याने रुग्णवाहिकांनाही रुग्णालयात जाण्यास अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. रस्त्यांवर पाणी साचल्याने बिगरकरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यामुळे पालिका रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात बुधवारी सकाळी गर्दी नव्हती, असे शीव येथील लो. टिळक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.