• चिपळूण, महाडला पुराचा वेढा; बदलापूरही जलमय
  • कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात दाणादाण
  • रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका; शेकडो लोक पुरात अडकले

राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली. कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला. बुधवारी रात्रभर झालेली अतिवृष्टी, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती या तिन्ही घटनांच्या एकत्रित परिणामाने गुरुवारी चिपळूण शहर जलमय झाले. चिपळूण मुख्य बाजारपेठेत सकाळी ११ वाजता १० फूट पाणी होते. शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले असून, काही ठिकाणी पहिल्या मजल्यांवरील घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरले. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तालुक्यात तब्बल २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. चिपळूणमध्ये दोन महिला पाण्यात बुडाल्या. त्यातील एकीचा मृत्यू झाला असून, दुसरी महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पुराच्या पाण्यात असंख्य दुचाकी-चारचाकी गाड्या वाहून गेल्या.

रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीने झोडपले. सावित्री, गांधारी, काळ आणि नागेश्वरी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराला पुराने वेढा घातला. बाजारपेठेत आठ ते दहा फूट पाणी होते. संपर्क यंत्रणा कोलमडली असून, सर्व रस्ते बंद आहेत. रात्री उशिरापर्यंत पूर ओसरलेला नव्हता. बिरवाडी आणि महाड औद्योगिक वसाहतीलाही पुराचा फटका बसला. पूर पाहण्यासाठी गच्चीवर गेलेले संजय नारखेडे यांचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. कर्जत, खोपोली, नागोठणे परिसरही जलमय झाले. कर्जत येथे दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले.

उल्हास नदीच्या पुराचा फटका बदलापूर, कल्याण तालुक्यातील गावे आणि कल्याण शहराच्या काही भागांना बसला. बदलापूर-कर्जत राज्य मार्ग आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. पुरात अडकलेल्या शंभरहून अधिक जणांची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका करण्यात आली.

पश्चिाम घाटक्षेत्रातही सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला. पश्चिाम महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, कोयनासह प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेसह प्रमुख नद्यांनी गुरुवारी इशारा पातळी ओलांडली असून, त्या धोका पातळीच्या दिशेने वाहत आहेत. जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्याही इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

अलीकडेपर्यंत जेमतेम पावसाची नोंद झालेल्या विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. नद्यांना आलेल्या पुरात वध्र्यात दोघे, चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यात एक शेतकरी वाहून गेला. यवतमाळ जिल्ह्यात पुरात वाहून गेलेला तरुण बचावला. मुसळधार पावसाने विदर्भात जनजीवन विस्कळीत झाले.

रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत

कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि काही भागांत रस्ते पाण्याखाली गेल्याने दोन्ही प्रकारची वाहतूक ठप्प झाली. लोणावळा-खंडाळा घाट विभागांत तीनशे मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याने पुणे-मुंबई लोहमार्गावर मंकी हिल ते पळसदरी  दरम्यान लोहमार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली. काही भागांत लोहमार्गाच्या वीजखांबांचे नुकसान झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. बदलापूर-वांगणी लोहमार्गावर पाणी आणि गाळ आल्याने वाहतूक बंद झाली. कर्जत-खोपोली लोहमार्गही ठप्प झाला. कोल्हापूर-रत्नागिरी, नेरळ-कळंब मार्ग पाण्याखाली गेल्याने बंद झाला. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.

परभणी जिल्ह्यात पिके पाण्याखाली

परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गोदावरी, दुधना या मुख्य नद्यांसह अन्य नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

२४ तासांतील पाऊस

जव्हार (४३० मि. मी.), वाडा (४२०  मि. मी.), माथेरान (३३० मि. मी.), कर्जत (३२० मि. मी.), पोलादपूर (२७० मि. मी.), संगमेश्वर, देवरुख (२५० मि. मी.), मुरबाड (२३० मि. मी.), महाड, शहापूर (२१० मि. मी.), खालापूर (२०० मि. मी.), कल्याण, खेड (१९० मि. मी.), माणगाव (१७० मि. मी.), दापोली (१६० मि. मी.), पेण (१५०  मि. मी.), भिवंडी, पनवेल (१४० मि. मी.), रोहा, ठाणे, वैभववाडी (१३०  मि. मी.), उल्हासनगर (१२० मि. मी., महाबळेश्वर (४८० मि. मी.), लोणावळा (३१० मि. मी.), गगनबावडा (२७० मि. मी.), ओझर खेडा (२५० मि. मी.), इगतपुरी (२४० मि. मी.), त्र्यंबकेश्वर (२२० मि. मी.), राधानगरी (२२० मि. मी.), पाटण (१६० मि. मी.), पन्हाळा (१५० मि. मी.) (पाथरी १३० मि. मी.), सेलू (११० मि. मी.), अकोला (२०० मि. मी.), बार्शी टाकळी (१७० मि. मी.)

लोणावळा-खंडाळा घाटक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीने पुणे-मुंबई लोहमार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

आजही मुसळधारांचा अंदाज

सोळा वर्षांपूर्वीच्या (२६ जुलै २००५) महापुरापेक्षाही मोठा जलप्रकोप चिपळूणकरांनी गुरुवारी अनुभवला. एसटी स्थानकातील बसगाड्या पुरात बुडाल्या असून, त्यांचा केवळ टपावरचा भाग दिसत होता.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये २३ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतरही दोन दिवस पाऊस कायम राहणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत आणखी तीन ते चार दिवस मुसळधारांचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांत २३ जुलैला मुसळधार आणि त्यानंतर तीन दिवस पाऊस कायम राहणार आहे.

महाडमध्ये घरांवर दरड कोसळली : महाड तालुक्यातील नाते रोडवर तोळीये गावावर गुरुवारी दरड कोसळली. त्यात ३१ घरांचे नुकसान झाल्याचे समजते. ढिगाऱ्याखाली काही जण अडल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, नेमके कितीजण अडकले, याबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.