मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची मस्त बॅटिंग सुरु आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळतो आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात पावसाच्या सरी रात्रीपासूनच कोसळत आहेत. तर अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस चांगलाच वाढला आहे.  संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने बॅकलॉग भरुन काढला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळतो आहे. पावसाचा परिणाम मुंबईतल्या लोकलसेवेववरही झाला आहे. मुंबईतल्या हार्बर, सेंट्रल आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरची वाहतूक १० मिनिटे उशिराने सुरु आहे. दादर, माटुंगा, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली या ठिकाणीही जोरदार पाऊस सुरु आहे.  मुंबईसह कोकणातही पावसाची जोरदार हजेरी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान खात्याने किनारपट्टी भागात हाय अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश स्थिती आहे. पुणे, पिंपरी आणि नाशिकमध्येही चांगला पाऊस होतो आहे. पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर नागरिकही चांगलेच सुखावले आहेत. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने मुंबईकरांची, पुणेकरांची पाण्याची चिंताही मिटल्यात जमा आहे.

दरम्यान पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारीच वर्तवला होता. आता पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून शुक्रवारीच व्यक्त करण्यात आली होती. त्याच अंदाजाप्रमाणे हा पाऊस कोसळतो आहे.