सलग चौथ्या दिवशी मुंबईकरांची पाठ न सोडणाऱ्या पावसाने मुंबईला बुधवारीही झोडपून काढले. मंगळवारी रेल्वे आणि रस्ते यांची कोंडी करून मुंबईकरांना हैराण करणाऱ्या पावसाने बुधवारीही तोच कित्ता गिरविला. बुधवारी पहाटेपासूनच दमदार सुरुवात करणाऱ्या पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेसेवा कोलमडली. पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने बेस्ट बसने कार्यालय गाठण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना निरुत्साही केले.  
मस्जिद आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेमार्गावरील गाडय़ा एका मागोमाग एक खोळंबल्या. पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना संध्याकाळी वांद्रे स्थानकाजवळ याच समस्येला तोंड द्यावे लागले. तर दुपारी तीनच्या सुमारास कुर्ला आणि चुनाभट्टी या स्थानकांदरम्यान चार इंचांपेक्षाही जास्त पाणी तुंबल्याने वडाळा ते कुर्ला या दरम्यानची हार्बर सेवा ठप्प झाली. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी आठच्या सुमारास अप जलद मार्गावर मस्जिद स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी या मार्गावरील गाडय़ा अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. ही गर्दीची वेळ असल्याने एकामागोमाग एक गाडय़ा खोळंबल्याचे पाहायला मिळत होते. तसेच अनेकांना कार्यालये गाठायलाही उशीर झाला. सकाळी अकराच्या दरम्यान हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. या दरम्यान १८ सेवा रद्द करण्यात आल्या. तसेच मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक तब्बल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होती. याच वेळी पश्चिम रेल्वेमार्गाला पावसाचा फटका बसला. बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या गाडय़ा कांदिवली स्थानकात पोहोचण्यास ४० मिनिटे लागत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरील इंडिकेटर्स ००.०० असेच आकडे दाखवत असल्याने प्रवाशांमध्येही संभ्रमावस्था होती. त्यामुळे गाडय़ांना गर्दी उसळली होती. दिवसभर पश्चिम रेल्वेवरील गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
हार्बर लाइन मार्गाला लागते आहे, तोच पश्चिम रेल्वेमार्गावर वांद्रे स्थानकाजवळ संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. हा बिघाड १५ मिनिटांत दुरुस्त झाला. मात्र ही गर्दीची वेळ असल्याने त्याचा फटका पश्चिम रेल्वेमार्गाला बसला. या मार्गावरील गाडय़ा संध्याकाळी पुन्हा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. मात्र या मार्गावर एकही सेवा रद्द झाली नसल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.