News Flash

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांचे हाल

दुरांतो एक्स्प्रेस १५ तास कसाऱ्याजवळ, सिद्धेश्वर एक्स्प्रेस १२ तासांनंतर रद्द

बदलापुरात सिद्धेश्वर एक्स्प्रेस थांबवण्यात आल्यानंतर त्यामधील प्रवाशांना खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले.

दुरांतो एक्स्प्रेस १५ तास कसाऱ्याजवळ, सिद्धेश्वर एक्स्प्रेस १२ तासांनंतर रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे कसारा ते इगतपुरी आणि कर्जत ते लोणावळा भागांत ठिकठिकाणी दरड कोसळणे, रुळांवर आलेला चिखल आणि अन्य घटनांचा मोठा फटका बुधवारी रात्री व गुरुवारी मुंबईतून निघालेल्या एक्स्प्रेस गाडय़ांतील प्रवाशांना बसला. बुधवारी रात्री सीएसएमटीतून कसाराला पोहोचलेली नागपूर दुरांतो एक्स्प्रेस तब्बल १५ तास कसाराजवळच होती. कसारा मार्ग पूर्ववत होताच ती गाडी गुरुवारी दुपारनंतर रवाना करण्यात आली. परंतु १२ तासांहून अधिक वेळ बदलापूर स्थानकातच अडकलेली सोलापूर सिद्धेश्वर एक्स्पेस रद्द केल्याने बदलापूपर्यंत पोहोचलेल्या प्रवाशांचे हाल झाले. पुण्याला जाणाऱ्या गाडय़ाही रद्द करण्यात आल्या.

सीएसएमटी ते नागपूर दुरोन्तो एक्स्प्रेस बुधवारी रात्री सव्वाआठ वाजता सुटली. मात्र ती कसाराजवळ पोहोचेपर्यंत पावणेदोन तास लागले. त्यानंतर रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ही गाडी कसारा स्थानकातच उभी होती, अशी माहिती या गाडीतून प्रवास करणारे ज्ञानेश जठार यांनी दिली. कसारा ते इगतपुरी मार्ग पूर्ववत झाल्यानंतर तीन वाजता निघालेली ही गाडी इगतपुरीला पोहोचण्यास पावणेदोन तास लागल्याचे ते म्हणाले. एकूण प्रवासाला साधारण १२ तास लागणाऱ्या या गाडीला इगतपुरीपर्यंतच १७ तास लागल्याचे जठार यांनी सांगितले. अनेक प्रवाशांनी कसारा स्थानकातूनच प्रवास अर्ध्यावर सोडला, असे ते म्हणाले.

सीएसएमटीतून सोलापूरसाठी रात्री पावणेअकरा वाजता निघालेली सिद्धेश्वर एक्स्प्रेस बदलापुरात एक तासाने पोहोचली. ही गाडी गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्थानकातच उभी होती. त्यानंतर ही गाडी रद्द करून पुन्हा सीएसएमटीला आणण्यात आली. तोपर्यंत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या प्रवाशांना तिकिटांचा परतावा देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

कल्याण, बदलापूर येथून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी प्रवाशांना एसटी गाडय़ांचीही सोय करण्यात आली. काही गाडय़ा कल्याण, ठाण्यापर्यंत चालवण्यात आल्या व रद्द केल्या. मुंबई ते पुणे मार्गालाही पावसाचा फटका बसल्याने या मार्गावरील सीएसएमटीतून पुण्यासाठी निघालेल्या डेक्कन एक्स्प्रेससह अन्य विशेष गाडय़ाही रद्द करण्यात आल्या. सकाळी स्थानक, टर्मिनसवर आलेल्या प्रवाशांना पुन्हा माघारी परतावे लागले.

एसटीची मदत

लांब पल्ल्याची तसेच उपनगरी रेल्वे वाहतूक कोलमडून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कसारा, इगतपुरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने पहाटे चार वाजता १३३ बस सोडल्या. त्यातून पाच हजार ८०० प्रवाशांनी प्रवास केला. ठाण्यातून ९३, नाशिक विभागातून ४० बस सोडण्यात आल्याचे सांगितले. पुणे ते मुंबई ते पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येण्यासाठी ६५ जादा बस आणि मुंबईतून नऊ बस सोडण्यात आल्या.

लोकल सेवेलाही फटका

अंबरनाथ, बदलापूर जवळ, वांगणी, कर्जत, खोपोली मार्गालाही फटका बसल्याने लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाडय़ा विस्कळीत झाल्या. वांगणी, उंबरमाळी आणि खडवली ते वाशिंद दरम्यान रुळांवर पाणी साचले. तसेच रुळाखालील माती व खडी वाहून गेल्याने मोठा फटका बसला. येथे मोठय़ा प्रमाणात काम हाती घेण्यात आले. त्यामुळे सीएसएमटी ते बदलापूर, अंबरनाथ तसेच टिटवाळापर्यंतच लोकल चालवण्यात येत होत्या. सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते पनवेल ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सुरळीत होत्या.

स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

रेल्वे वाहतूक कोलमडल्यामुळे सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. अंबरनाथ स्थानकापासून काही प्रमाणात रेल्वेची सेवा सुरू होती. त्यामुळे त्यापुढील प्रवासी रिक्षा किंवा अन्य मार्गाने अंबरनाथ स्थानक गाठून पुढील प्रवास करत होते. परिणामी अंबरनाथ स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा भागांतून येणाऱ्या लोकलवर विठ्ठलवाडी, कल्याण, शहाड, आंबिवली, डोंबिवली प्रवाशांना अवलंबून राहावे लागत होते. बदलापूर, टिटवाळाकडून येणाऱ्या गाडय़ा प्रवाशांनी तुडुंब भरून येत होत्या. पुढील स्थानकांवरील प्रवाशांना लोकलमध्ये चढताना कसरत करावी लागत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 1:07 am

Web Title: heavy rains hit long distance rail passengers zws 70
Next Stories
1 घरोघरी लसीकरणापूर्वी यादीतील व्यक्तींची पडताळणी
2 तानसा, मोडकसागर तलाव काठोकाठ
3 लहान इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी खासगी संस्थांमार्फत
Just Now!
X