राज्यात पावसाला पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. मागील २२ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

बुधवार सकाळी ८ वाजून ३० मिनीटांपासून ते आज सकाळपर्यंत बांद्रा – २०१ मिमी, कुलाबा – १५२ मिमी, सांताक्रुझ – १५९.४ मिमी, महालक्ष्मी – १२९ मिमी, राम मंदिर – १३० मिमी पावासाची नोंद झाली असल्याची माहिती मिळाली आहे.काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दादरमधील विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. यामुळे नागरिकांना जीवमुठीत धरूनच मार्ग काढावा लागत होता. मुंबई पोलीस नागरिकांना मदत करत होते.

तसेच आज (गुरुवार) किनारपट्टीवर मुसळधार तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, या भागांसाठी तयारीत राहण्याचा इशारा (ऑरेंज अर्लट) देखील देण्यात आला आहे. तर, गुरुवारनंतर पावसाची तीव्रता कमी होत जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

पावसामुळे मुंबईत पाणी साचण्याच्या घटनांचे पूर्वानुमान देणाऱ्या ‘आयफ्लोज मुंबई’ नव्या प्रणालीनुसार भायखळा, आग्रीपाडा, दक्षिण मुंबई, देवनार, अंधेरी (प.), विलेपार्ले (प.) या प्रभागातील सखल भागात काही ठिकाणी दोन फूट पाणी साचू शकते. तर चेंबूर, वरळी, लोअर परळ, भांडूप (प.) आणि दहिसर प्रभागातील काही ठिकाणी एक फूट पाणी साचण्याची शक्यता आहे.

दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. १५ ते १७ जुलै या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले होते, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिलेला आहे.