ग्रँटरोड, कुलाबा, मलबार हिलमध्ये सर्वाधिक पाऊस

मुंबई : बुधवारी वेगवान वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने मुंबईला विशेषत: दक्षिण मुंबईला चांगलेच झोडपले. या ठिकाणी अवघ्या चार तासात तब्बल ३०० मिमी पाऊस पडला.  ग्रँटरोड, कुलाबा, मलबार हिलमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

बुधवारी दुपारी २ वाजल्यानंतर वेगवान वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दक्षिण मुंबईतील लोकांना अक्षरश: २६ जुलैच्या पावसाची आठवण झाली. पालिकेने मुंबईत विविध ठिकाणी लावलेल्या पर्जन्य मापक यंत्रातील आकडेवारीनुसार दक्षिण मुंबईत नरिमन पॉइंट, कुलाबासह, मशीद बंदर, डी विभाग क्षेत्रामध्ये नानाचौक, मलबार हिल, ग्रँटरोड पूर्व या ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली. तर गिरगाव, मरिन लाइन्स परिसरात सर्वाधिक वेगवान वारे ताशी १०१ किमी वेगाने वाहत होते, अशीही नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात सरासरी ११७ मिमी पावसाची नोंद झाली तर पूर्व उपनगरात दिवसभरात १६० मिमी पाऊस पडला. तर सर्वात कमी पाऊस मालाड मालवणी परिसरात ८२ मिमी इतका पडला.

आपत्कालीन विभागात दूरध्वनींचा पाऊस

पालिकेच्या आपत्कालीन विभागात दिवसभरात मदतीसाठी ३२०२ दूरध्वनी आले होते. त्यापैकी बहुतांशी दूरध्वनी हे झाड पडले, शॉर्टसर्किट झाले, वीज नाही, पाणी तुंबले अशा स्वरूपाचे होते. झाडे पडल्याच्या तब्बल ३६१ तक्रारी पालिकेकडे आल्या. दक्षिण मुंबईत मंत्रालयाच्या आसपास, मलबार हिल परिसरात, नानाचौक गावदेवी परिसरात मोठय़ा प्रमाणावर झाडे अक्षरश: उन्मळून पडली होती. ही झाडे हटवण्याचे काम अग्निशमन दल व उद्यान विभागामार्फत पहाटेपर्यंत सुरू होते.

विजेचा धक्क्याने दोघांचा मृत्यू

विजेचा धक्का लागून गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी एक जण रेल्वेचा कर्मचारी आहे. दहिसर पूर्व येथील आनंदनगरमधील माईल स्टोन सोसायटीत विजेचा धक्का लागून शंभू सोनी यांचा मृत्यू झाला तर गुरुवारी पहाटे  मशीद बंदर येथील संजीव नावाच्या २२ वर्षांच्या रेल्वे कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याची घटना घडली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असतामृत घोषित केले.

झाड पडून एक जखमी

कुर्ला पश्चिम येथे झाड पडून एक जण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजता हॉल व्हिलेज येथील अर्चल पार्क इमारतीच्या समोरील झाड अचानक केन डिसुझा (३९ वर्षे) यांच्या अंगावर कोसळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.