मुंबईमध्ये शुक्रवारप्रमाणेच शनिवारी संध्याकाळीही मेघगर्जनेसह विजांचा लखलखाट करीत जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पूर्व मुक्त मार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नालेसफाईचा पावसाने फज्जा उडविला. सायंकाळी अवघ्या दोन तासांमध्ये मुंबई सेंट्रल आणि कुर्ला परिसरात सर्वाधिक पाऊस पडल्याने या परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती. मात्र रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नव्हता, असे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातून सांगण्यात आले. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आभाळ दाटून आले आणि सोसाटय़ाचा वारा वाहू लागला. त्यापाठोपाठ विजांचा चमचमाट आणि मेघगर्जना सुरू झाली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ ते रात्री ८ या दोन तासांमध्ये पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपले. पालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जलमय झालेल्या भागातील पंप सुरू केले आणि साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र तब्बल पाऊण तास नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागले. तर काही काळासाठी वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली. शनिवारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत मुंबई शहरात सरासरी ३५.९ मि.मी., पूर्व उपनगरात ३०.९ मि.मी., तर पश्चिम उपनगरात ११.१३ मि.मी. पावसाची नोंद झाली.