News Flash

तुंबई ! मुसळधार, अविरत पावसामुळे मुंबई, ठाण्यात पाणीच पाणी!

सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारचा अख्खा दिवस मुंबईला झोडपून काढले. पावसाचा जोर आणि त्यातच समुद्राला आलेले उधाण यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबून

सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारचा अख्खा दिवस मुंबईला झोडपून काढले. पावसाचा जोर आणि त्यातच समुद्राला आलेले उधाण यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबून नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद पडली, तर मध्य रेल्वेची वाहतूक रखडत सुरू राहिली. पावसाचा हा जोर आणखी तीन दिवस असाच राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाचा हा जोर राज्यभर असून कोकण आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर बहुतांश धरणे ५१ टक्क्यांपेक्षा भरली असून धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची भीती आहे.

आभाळ  फाटलेले!
मुंबई : मुंबईवर पावसाची कृपावृष्टी सातत्याने सुरूच असून मंगळवारी मुसळधार पावसाने मुंबईकरांची अक्षरश दाणादाण उडवली. अनेक भागांत पाणी साचले. अतिवृष्टी आणि समुद्राला आलेली भरती यामुळे पाण्याचा निचराच न झाल्याने उपनगरंतील सखल भाग जलमय झाले होते. पावसाच्या तडाख्यात अंधेरी, पवई येथे भिंत कोसळून तीन जण जखमी झाले.
पावसाने शनिवारी ‘संततमार’ केल्यानंतर शहरात रविवार आणि सोमवारी हलक्या सरी पडल्या. मात्र मंगळवारपासून पुन्हा एकदा पावसाने हिसका दाखवला. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात कुलाबा येथे २७.१ मि.मी., तर सांताक्रूझ येथे ५८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारी अडीच वाजेपर्यंतच्या सहा तासात कुलाबा येथे ६६.८ मि.मी., तर सांताक्रूझ येथे ६६.६ मि.मी. पाऊस पडला. पुढील पाच दिवस पावसाचा प्रभाव कायम राहणार असून पुढील तीन दिवस मुंबईसह कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे,’ अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी दिली.

आज ४.९५ मीटर उंचीच्या लाटा
पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास मुंबईच्या किनारपट्टीवर सुमारे ५ मीटर उंचीच्या लाटा धडकणार आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर फिरू नये, असा इशारा पालिकेने दिला आहे. मंगळवारी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दुपारी १२.४३ च्या सुमारास ४.८८ मीटर उंचीची लाट धडकण्याचा इशारा देण्यात आल्याने पालिका अधिकारी धास्तावले होते. मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. बुधवारी दुपारी १.२७ वाजता ४.९५ मीटर, तर गुरुवारी दुपारी २.१० वाजता ४.८९ मीटर उंचीच्या लाटा मुंबईच्या किनाऱ्यावर धडकणार आहेत.

ठाण्यातही जोर
गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्य़ात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी वाढल्याने ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. तसेच काही भागात वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे रेल्वे तसेच महामार्गावरील वाहतूक काहीशी मंदावली होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या शहरांसह ग्रामीण परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागात वृक्ष उन्मळून पडले. तसेच ठाणे आणि बदलापूर भागात संरक्षक भिंत कोसळ्याचा प्रकार घडला. सायंकाळच्या सुमारास मुंब्रा येथील पारसिक बोगद्याजवळ रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर झाड पडले. परंतु तरीही रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला नाही.

भिंत कोसळून तिघे जखमी
सांताक्रूझ येथील वाकोला पुलावर सकाळी औषधाच्या दुकानाची भिंत पडली. त्यात कोणीही जखमी झाले नाही. अंधेरी पश्चिम येथील समतानगरमध्ये दुपारी बर्फीवाला लेनमधील भिंत पडली. त्यामुळे जितेंद्र पटेल (१६) आणि मुकेश पटेल (१८) हे दोघे जखमी झाले. याच सुमारास पवई येथे सनसिटी संकुलाच्या बाजूची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली नीलेश राऊळ (१७) हा तरुण अडकला होता. त्याला बाहेर काढण्यात आले.

विहार तलाव भरला
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाहू लागला. मोडकसागर, तानसा आणि तुळशी तलाव यापूर्वीच भरले असून बांधकाम अपूर्णावस्थेत असलेल्या मध्य वैतरणा तलावातही सध्याच्या क्षमतेएवढे पाणी जमा झाले आहे.
मुंबईच्या पाणीपुरवठय़ात ५९ टक्के वाटा असलेला भातसा तलाव, तसेच अप्पर वैतरणा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. तलावांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख दशलक्ष लिटर एवढी आहे.

पावसाची आकडेवारी
११०मिमी.  मुंबई उपनगर
७७मिमी.   मुंबई शहर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 4:02 am

Web Title: heavy rains lash mumbai throw life out of gear
Next Stories
1 मध्य, पश्चिम रेल्वे तरीही सुरळीत!
2 पावलोपावली आम्हां खड्डय़ांचा संग..
3 मुंबईत महिला बचत गटांसह इस्कॉनला दंड : माध्यान्ह भोजनातील ७८ टक्के खिचडीचे नमुने निकृष्ट
Just Now!
X