बंगालच्या उपसागरात वायव्येला तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन-चार दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात घाटमाथ्यावर बुधवारी काही ठिकाणी, तर गुरुवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ात काही ठिकाणी अतिवृष्टीची (२०० मिमीपेक्षा अधिक) शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसाच्या पूर्वानुमानानुसार १९ सप्टेंबपर्यंत किनारपट्टी, उत्तर मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, विदर्भ या परिसरांत पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. नंतरच्या आठवडय़ात २६ सप्टेंबपर्यंत किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडू शकतो. त्यानंतर १० ऑक्टोबपर्यंत पाऊस कमी झालेला असेल. केवळ मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असून इतर ठिकाणी हलका ते किरकोळ पाऊस अपेक्षित आहे.

पावसाचा पहिला महिना कोरडा गेला असला तरी गेल्या अडीच महिन्यांत लावलेल्या दमदार हजेरीमुळे पावसाने राज्यात अनेक ठिकाणी सरासरी ओलांडली. मात्र, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवण्यात आला. सोलापूर जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा ५४ टक्के कमी पाऊस झाला, तर बीड आणि यवतमाळमध्ये सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पाऊस झाला.

नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्य़ांत मुसळधार (६५ ते ११५ मिमी) पाऊस पडण्याची शक्यता आहे.