मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये रविवारच्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी रात्रीपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अजुनही ठाणे, कल्याण, अंबरनाथ-बदलापूर भागात पाऊस पडतोच आहे. भारतीय वेधशाळेनेही पुढचे काही तास मुंबई आणि नजिकच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु राहिल अशी शक्यता वर्तवली आहे.

आज दुपारी मुंबईच्या समुद्रात ४.५ मी. उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला मुंबई पोलिस आणि प्रशासनाने दिला आहे. समुद्र खवळलेल्या परिस्थितीत असल्यामुळे मच्छीमार बांधवांनाही आपल्या होड्या समुद्रात न उतरवण्याची विनंती केली आहे. याचसोबत मुंबईत वाकोला, अंधेरी, मिलन सब-वे, सायन-कुर्ला या भागात पाणी साचलेलं आहे.

मुंबईसोबतच ठाणे-रायगड आणि कोकण किनारपट्टीलाही पावसाचा फटका बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे.

आज दिवसभर पावसाची परिस्थिती कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावं अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. खरबदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या आठ पथकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.