मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवेवर प्रचंड प्रवासी ताण; पायाभूत सुविधांच्या विस्ताराकडे रेल्वेचे दुर्लक्ष; छोटी स्थानकेही तुडुंब

सुशांत मोरे, मुंबई

डोंबिवली स्थानकातून सोमवारी सकाळी नऊ वाजताची लोकल पकडणाऱ्या चार्मी पासड या २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटनेने मुंबईच्या उपनगरी सेवेवरील प्रवासी ताण, वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात हे मुद्दे ऐरणीवर आणले आहेत. एकीकडे, लोकल फेऱ्यांमध्ये सातत्याने वाढ केली जात असताना प्रवाशांच्या गर्दीचा ओघ मात्र कायम आहे. एवढेच नव्हे, तर एके काळी गर्दीची स्थानके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडक स्थानकांच्या मागील-पुढील छोटय़ा छोटय़ा स्थानकांतील गर्दीही मी म्हणू लागली आहे.

डोंबिवली स्थानकात घटलेल्या  घटनेनंतर रेल्वे प्रवाशांतून तीव्र पडसाद उमटत आहेत. ‘लोकसत्ता’कडे वाचकांनी ईमेलद्वारे प्रतिक्रिया पाठवल्या. यातील बहुतांश प्रतिक्रिया रेल्वे प्रवासातील कसरतीचे वर्णन करणाऱ्या आहेत. वाढते अपघात, आसनासाठी वाद, प्रवेशद्वार अडवून केली जाणारी अडवणूक आदी कारणांमुळे उपनगरांतील कल्याण, डोंबिवली, ठाणे ही स्थानके कायम चर्चेत असत. यात आता बदलापूर, अंबरनाथ, दिवा, मुलुंड, कळवा, मुंब्रासारख्या लहान स्थानकांचीही भर पडली आहे.

एके काळी सर्वाधिक तिकीट विक्री असलेल्या सीएसएमटी, दादर, कुर्ला स्थानकांतील प्रवासी संख्या कमी होते आहे. सीएसएमटीतील दररोजची प्रवासी संख्या १.४४ लाखांवरून १.४० लाखावर, तर दादरमधील प्रवासी संख्या ७३ वरून ७१ हजारांवर आली आहे. दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या प्रवाशांकरिता लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होते. या तीन स्थानकांतून सध्याच्या घडीला दररोज ७.६६ लाख प्रवासी प्रवास करतात. २०१७-१८ मध्ये हीच संख्या ७.२५ लाखांपर्यंत होती. आता या पंक्तीत छोटय़ा स्थानकांचीही भर पडते आहे. दिवा, कळवा, मुंब्रा, बदलापूर, अंबरनाथ येथे स्वस्तातील छोटय़ा घरांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या वाढते आहे. सकाळी गर्दीच्या वेळी  कल्याण, डोंबिवली, ठाणे येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये छोटय़ा स्थानकांतील प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी कसरत करावी लागते.

प्रवासी वाढले, पण फेऱ्या नाही

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी संख्येत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. २०१५-१६ साली लोकलने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ४०.२७ लाख होती. २०१७-१८ मध्ये ती ४२.३९ लाख झाली, तर २०१८-१९ मध्ये ४४.३० लाखांवर गेली. तुलनेने लोकल फेऱ्यांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, कुर्ला ते परळ पाचवा-सहावा मार्ग याव्यतिरिक्त अनेक प्रकल्पांना गती मिळालेली नाही. त्यामुळे फेऱ्या वाढवण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले आहे. २०१७-१८ मध्ये दररोज १,७०६ लोकल फेऱ्या होत होत्या. २०१८-१९ मध्ये याच फेऱ्यांची संख्या वाढून १,७७४ झाली. आता १४ डिसेंबर २०१९ पासून नवीन वेळापत्रक लागू करताना मुख्य मार्गावरील ४२ फेऱ्यांच्या वेळा बदलल्या. तर काही फेऱ्यांचा विस्तार केला गेला. पण फेऱ्यांची संख्या वाढलेली नाही. छोटय़ा स्थानकांतील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्षच झाले आहे. वर्षांनुवर्षे गर्दीची ओळखल्या जाणाऱ्या स्थानकांमध्येच सोयीसुविधांवर भर देण्यात आला.

 

लोहमार्ग स्थानक                                     मृत्यू             जखमी

कुर्ला (कुर्ला ते मुलुंड)                                 ६७                    ८५

ठाणे (ठाणे ते दिवा, ऐरोलीपर्यंत)               ३९                   १३६

डोंबिवली (कोपर ते ठाकुर्ली, जूचंद्र वैगैरे)    ४१                    ४५

कल्याण (कल्याण ते कर्जत)                        ५०               १३४

 

लोकलमधून पडून अपघात

५५६ जाने.-नोव्हें. २०१९ पर्यंतची संख्या

७११     २०१८  मधील मृत्यू

१२६९ जाने.-नोव्हें. २०१९ पर्यंत जखमी

१५८५ २०१८ मधील  जखमी