येत्या 24 ते 48 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ विश्वंभर यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. सध्या पहिल्या चोवीस तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, सकाळच्या वेळेत पाऊस कमी प्रमाणात असेल. तर रात्रीच्या वेळी अतिवृष्टी होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच येत्या 26 आणि 27 जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. २४ आणि २५ जुलैला कोकण विभागातील मुंबईसह इतर काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता आहे.

कोकण परिसरामध्ये सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचप्रमाणे कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण विभागासह राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी आहे. पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडणार आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. २३ जुलैला कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. २४ आणि २५ जुलैला कोकण विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.