रत्नागिरीत दादर पॅसेंजरमध्ये प्रवाशांचा पाच तास ठिय्या 

अलिबाग : गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर मुंबईला परतू लागलेल्या कोकणातील गणेशभक्तांच्या मार्गात वाहतूक कोंडीबरोबरच रेल्वेच्या गर्दीचे विघ्न उभे ठाकले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दादर-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये जागा न मिळाल्याने संतापलेल्या गणेशभक्तांनी ही गाडी पाच तास रोखून धरली, तर रायगड जिल्ह्य़ात मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी गणेशभक्तांचे वाहतूक कोंडीत हाल झाले.

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांनी दादर-रत्नागिरी पॅसेंजर पकडण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मंगळवारी पहाटे तुफान गर्दी केली होती. या गाडीत जागा न मिळाल्याने शेकडो प्रवासी संगमेश्वर आणि खेडसाठी आरक्षित ठेवलेल्या डब्यात घुसले. त्यांनी डब्यात ठिय्या दिल्याने प्रचंड गोंधळ झाला. हा गोंधळ सुमारे पाच तास सुरू होता.

ही पॅसेंजर गाडी मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर म्हणून मध्यरात्री रत्नागिरीत येते. तिला काही काळ थांबवून पहाटे दादर-रत्नागिरी पॅसेंजर म्हणून सोडण्यात येते. परंतु ही गाडी रत्नागिरी स्थानकावर आली तेव्हा तीत पाय ठेवायलाही जागा नव्हती. वास्तविक मडगावहून आलेल्या या गाडीतील प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकावर उतरणे अपेक्षित होते. परंतु ते जागा बळकावून बसल्याने रत्नागिरी स्थानकावरील प्रवाशांना गाडीत जागाच नव्हती. त्यामुळे ते संतापले आणि त्यांनी खेड आणि संगमेश्वरसाठी आरक्षित असलेल्या डब्यांचा ताबा घेतला. ‘मडगावहून आलेल्या प्रवाशांना बाहेर काढा, मग आम्ही बाहेर पडू’, असा पवित्रा रत्नागिरीतील प्रवाशांनी घेतला.  या गदारोळात गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. गोंधळ वाढत गेल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह पोलीस आणि विशेष दलाची तुकडी स्थानकावर दाखल झाली. आरक्षित डब्यात बसलेल्या प्रवाशांना बळाचा वापर करून बाहेर काढण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे ते बाहेर पडले. रेल्वे अधिकारी आणि रेल्वे पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांनी केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये या प्रवाशांची व्यवस्था केली. त्यानंतर दादर पॅसेंजर मुंबईकडे रवाना झाली.

चौपदरीकरणाचा फटका : मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरूआहे. त्यासाठी इंदापूर ते पळस्पे दरम्यान ठिकठिकाणी वळण रस्ते देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. वाहनचालक मार्गिकेची शिस्त पाळत नसल्याने वाहतूक कोंडी वाढत गेली. माणगाव, इंदापूर, वडखळ, कोलाड परिसरातील फेरीवालेही वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रायगडमध्ये कोंडी

पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनानंतर कोकणात गेलेले गणेशभक्त मंगळवारी मुंबईकडे परतू लागल्याने एकाचवेळी मोठय़ा प्रमाणात वाहने रस्त्यावर आली. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्य़ात माणगाव-लोणेरे-इंदापूर पट्टय़ात दुपारी तीन -साडेतीनच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर लागल्या होत्या. वाहने कासवगतीने पुढे सरकत होती. आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासन्तास लागले. मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर आलेली वाहने आणि बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळे पोलिसांचे वाहतूक नियोजन काही काळ कोलमडले. त्यामुळे परतणाऱ्या गणेशभक्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ही वाहतूक निजामपूर- पाली मार्गे वळवून वाहतूककोंडी फोडण्याचा प्रयत्न महामार्ग पोलिसांनी केला.