अडीच महिने निवांत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा; खासगी वाहनांनी प्रवास करण्यास प्राधान्य

मुंबई : गेले ७८ दिवस चाकांचे घर्षण, वाहनांचा धूर आणि हॉर्नचा गजबजाट यांचा त्रास नसल्याने ‘निवांत’ असलेल्या मुंबईतील रस्त्यांना सोमवारी भल्या सकाळपासून जाग आली. टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी खासगी वाहनांनी कामाचे ठिकाण गाठण्यास सुरुवात केल्याने पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गासह मुंबईतील अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित व्यवस्था आणि त्याद्वारे करोना संसर्गाची भीती यामुळे बहुतांश नोकरदारवर्ग दुचाकी, चारचाकीच्या प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.

टाळेबंदी शिथिलीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने १० टक्के  उपस्थितीसह खासगी कार्यालये सुरू करण्यास मुभा दिली. मात्र, मुंबईची जीवनवाहिनी असणारी उपनगरीय रेल्वे बंद असल्याने रस्ते वाहतुकीशिवाय नागरिकांना पर्याय नाही. त्यातच बस, रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय मर्यादित स्वरूपात चालवण्यात येत असल्याने अनेकांना खासगी वाहनाने नोकरीचे ठिकाण गाठावे लागले. परिणामी, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांचा ओघ सकाळपासूनच वाढू लागला. मुंबई महानगर परिसरात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसल्यामुळे इतरांचीही वर्दळ वाढल्याचे दिसले.

पूर्व द्रुतगती मार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास वाहनांच्या रांगा वेगाने मुंबईच्या दिशेने सरकत होत्या. मात्र घाटकोपरनजीकच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी किमान दोनशे मीटरच्या टप्प्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तर शीव येथून पुढे प्रत्येक सिग्नलवर मोठी गर्दी होती. शहरातील सर्वच उड्डाणपुलांच्या अलीकडे वाहतूक कोंडी दिसून आली. किं ग्ज सर्क ल, हिंदमाता, मडकेबुवा चौक परळ, भायखळा, महंमद अली रोड या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

पश्चिम द्रुतगती मार्गावरदेखील मोठय़ा प्रमाणात वाहने उतरल्याने बोरिवली येथून लोअर परळ गाठण्यास दोन तास लागले. पश्चिम द्रुतगती मार्गावरील कोंडी दिवसभर सुरूच होती. तुलनेने पूर्व द्रुतगती मार्गावर दुपारी काहीशी मोकळीक दिसली. शहरातील या वाढलेल्या गर्दीमुळे बहुतांश सिग्नल्सवर वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रणासाठी सज्ज राहावे लागले होते.

खासगी वाहनांची गर्दी वाढलेली असल्याने फोर्ट परिसरातील काही वाहनतळांवर गर्दी दिसून आली. विशेषत: हॉर्निमन सर्कल येथील वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरला होता. लोअर परळ, परळ, वांद्रे-कुर्ला संकुल, फोर्ट, नरिमन पॉइन्ट यांसारख्या कार्यालयीन

परिसरात खाद्यपदार्थाचे अनेक गाडे, टपऱ्या एरवी मोठय़ा प्रमाणात असतात. दहा टक्के उपस्थितीत कार्यालये सुरू झाली असली तरी अद्याप या गाडय़ा आणि टपऱ्या सुरू झाल्या नव्हत्या. काही प्रमाणात हॉटेलमधून पार्सल सुविधा तसेच काही तुरळक ठिकाणी वडापाव आणि चहाची सुविधा दिसून आली.

साथसोवळय़ाला तिलांजली

दुचाकी वाहनावर दोघांनी प्रवास करण्यास मज्जाव असला तरी बहुतांश दुचाकींवर दोघे जण प्रवास करताना दिसले. प्रवासाचे पर्याय मर्यादित असल्याने कार्यालयीन सहकाऱ्यांनी तसेच मित्रांबरोबर कार्यालय गाठण्याचा अनेकांचा प्रयत्न या वेळी दिसून आला. अनेक चारचाकी वाहनांमध्येही चालकासकट चार प्रवाशांचा प्रवास या वेळी सुरू असताना दिसला.

काहींचे आस्ते कदम

खासगी कार्यालयांना दहा टक्के उपस्थितीसह मुभा दिल्यानंतर काही कार्यालये सोमवारीच सुरू झाली. प्राथमिक काम सुरू करता येईल अशा कर्मचाऱ्यांना यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. त्यातही मुंबई शहर आणि उपनगरातील तसेच स्वत:चे वाहन असणारे कर्मचारी यांच्यावरच या कार्यालयांनी भिस्त ठेवली. विशेषत: छोटय़ा स्वरूपातील खासगी कार्यालयांनी सध्या तरी ज्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशांना घरीच थांबण्यास सांगितले, तर अनेक कॉर्पोरेट कार्यालयांनी लगोलग काम सुरू न करता सुरुवातीचे दोन-तीन दिवस स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी बाबींना प्राधान्य दिल्याचे सांगितले.   लोअर परळ, परळ, वांद्रे-कुर्ला संकुल अशा नव्याने निर्माण झालेल्या व्यवसाय केंद्राच्या ठिकाणी असलेल्या टोलेजंग टॉवरमध्ये अनेक खासगी कार्यालये आहेत. मात्र या ठिकाणी मर्यादित वर्दळ दिसून आली.